Indapur Suicide : पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या पतीनेही आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केलाय. दोनच दिवसांपूर्वी पत्नीचा आजाराने मृत्यू झाला तर आज पतीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जातीये. मात्र, नियतीच्या या क्रूर खेळात मात्र 7 महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या मृत्यूने नैराश्य आल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. स्वप्नील सुतार असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मी थकलोय जरा आराम करतो म्हणून गेला आणि जीवन संपवलं
अधिकची माहिती अशी की, स्वप्निल याची पत्नी श्रावणी सुतार हिचा डेंग्यूमुळे शुक्रवारी निधन झाले. आज स्वप्नील याने मी थकलोय जरा आराम करतो असे म्हणत घरातील खोलीत गेला. बराच वेळ झाल्याने घरातील नातेवाईकांनी त्याला हाका मारल्या. मात्र आतून प्रतिसाद न आल्याने खिडकीतून डोकावून पाहता स्वप्नील याने छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी
कौटुंबिक वादातून मातेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोमम्मनाळ गावात ही दुर्दैवी घटना घडली. कौटुंबिक वाद झाल्याने आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यल्लावा करीहोळ वय 30 असे आईचे नाव असून तर पाच वर्षाचा सात्विक व एक वर्षाचा मुतप्पा अशी मयत दुर्दैवी मुलांची नावे आहेत. यल्लवा करीहोळ या महिलेचा आपल्या पतीसोबत वारंवार भांडण तंटा होत असे. यामुळे नैराश्यातून आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आज आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी यल्लवा हिच्या माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला.घटनास्थळी रायबाग पोलीसानी भेट देऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटना रायबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या