Crime News : सध्याची तरुणाई सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड अॅक्टिव्ह असते. त्यांचं संपूर्ण आयुष्य सोशल मीडियाभोवतीच फिरतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच सोशल मीडियाच्या प्रभावामुळे एका एका अल्पवयीन मुलीनं आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या गळ्यावर चाकूनं सपासप वार करुन त्याची हत्या करण्यात आली.
उत्तर दिल्ली परिसरात (Delhi Crime News) एका दिवसापूर्वी एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. या संपूर्ण घटनेत एका अल्पवयीन मुलीचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तिनंच हत्येचा कट रचला, त्यानंतर भाऊ आणि दोन मित्रांच्या मदतीनं आधी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याची हत्या केली. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येवरुन वाद झाला आणि तो विकोपाला जाऊन हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अल्पवयीन तरुणी, तिचा भाऊ आणि एका मित्राला अटक केली आहे. तर तरुणीचा आणखी एक मित्र फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. ही घटना उत्तर बाह्य दिल्लीत घडली आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे दोन कारण असल्याचं दिसत आहे. पहिलं कारण म्हणजे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येवरुन त्यांच्यात झालेला वाद. तसेच, दुसरं कारण म्हणजे, अल्पवयीन तरुणी आणि हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं एखादं जुनं वैर. सध्या पोलीस सर्व बाजूनं या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावून योग्य ती कारवाई करु, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
तरुणाच्या गळ्यावर चाकूनं वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाची एका 17 वर्षीय आरोपी तरुणीशी मैत्री होती. याच तरुणीनं साहिलच्या हत्येचा कट रचला. बुधवारी रात्री मुलीनं तिचे दोन मित्र आणि भावाच्या मदतीनं साहिलची हत्या केली. साहिलच्या मानेवर चाकूचे निशाण आढळून आले आहेत. त्यामुळे साहिलची हत्या गळ्यावर चाकून वार केल्यानं झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. साहिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान साहिलचा मृत्यू झाला.
दसऱ्याच्या दिवशी रात्री घडली घटना
पोलिसांनी या प्रकरणी कलम 302 अन्वये एफआयआर नोंदवून तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. त्यांच्याकडून एक चाकूही जप्त करण्यात आला आहे. या हत्येसाठी मुलीनं तिचा भाऊ आणि दोन मित्रांची मदत घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर कटानुसार त्यांनी साहिलला 10 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी रात्री घराजवळ बोलावलं.
मित्रानं चाकू काढला अन् हल्ला केला
साहिल तरुणीच्या घराजवळ पोहोचताच तिचे दोन मित्र आणि भाऊ तिथे पोहोचला. त्यानंतर तरुणीच्या एका मित्रानं चाकू काढून साहिलच्या गळ्यावर सपासप वार केले. यात साहित गंभीर जखमी झाला. सध्या पोलिसांनी अल्पवयीन तरुणीसह तिचा भाऊ आणि एका मित्राला ताब्यात घेतलं आहे. तर आणखी एक मित्र फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :