Chandrapur Crime : पोटच्या मुलीने भावजयीच्या मदतीने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. शेतीच्या वादातून हा खून केल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी दोघींनी आईचा मृतदेह जमिनीत पुरुन अंत्यविधी देखील केला. तानाबाई महादेव सावसागडे (वय 65 वर्षे) असं मृत महिलेंच नाव आहे.


चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर इथली ही घटना आहे. शेतीच्या वादातून तानाबाई सावसागडे यांच्या मुलीने आणि सुनेने 3 ऑक्टोबर रोजी नाक-तोंड दाबून खून केला. इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघींनी मृतदेह जमिनीत पुरुन अंत्यविधी देखील केला. 4 ऑक्टोबर रोजी तानाबाई सावसागडे यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मोठ्या मुलगी रंजना सोनवणे यांना देण्यात आली. परंतु इथे आल्यावर रंजना सोनवणे यांना काहीतरी संशयास्पद  जाणवलं. या सगळ्या प्रकारात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय त्यांला आला. 


मोठ्या मुलीकडून पोलिसात तक्रार
यानंतर रंजना सोनवणे यांनी 5 ऑक्टोबर रोजी सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपली आई बेपत्ता असून तिचा खून झाला असल्याची तक्रार नोंदवली. घरातील व्यक्तींनीच खून केला असावा असं त्यांनी तक्रारीत म्हटलं. या तक्रारीची दखल घेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तानाबाई यांच्या मुलीला आणि सुनेला ताब्यात घेऊ चौकशी केली. सुरुवातीला चौकशीदरम्यान दोघींनीही उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सत्य उघड केलं.


कोणालाही न कळता मृतदेह जमिनीत पुरुन अंत्यविधी उरकला
शेतीच्या वादातून 3 ऑक्टोबर रोजी तानाबाई यांची नाक आणि तोंड दाबून हत्या केल्याची कबुली दोघींनी दिली. या दोघी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी गावात कोणालाही न कळता मृतदेह जमिनीत पुरुन अंत्यविधी देखील उकरला. यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगी वंदना खाते (वय 35 वर्षे) आणि सून चंद्रकला सावसागडे (वय 40 वर्षे) यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.


शेतात वाटा हवा यासाठी खून
तानाबाई सावसागडे यांच्याकडे शेत आहे. मुलगी वंदना खाते आणि सून चंद्रकला सावसागडे यांना या शेतात वाटा हवा होता. परंतु तानाबाई शेतजमिनीचा वाटा करण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे पोटच्या मुलीने आणि सुनेने रागाच्या भरात तानाबाई यांचा खून केला, असं त्यांनी पोलिसांनी दिलेल्या कबुलीत म्हटलं.