Delhi Murder Case:  एका वादातून अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून हत्या करणारा आरोपी प्रियकर साहिलला (Sahil) अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री, दिल्लीतील (Delhi) शाहबाद डेअरी परिसरात ( Shahbad Dairy) ही खळबळजनक घटना घडली. आरोपी साहिलकडून अल्पवयीन प्रेयसीवर वार करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला बुलंदशहरमधून अटक केली आहे.


दिल्लीत रविवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. आरोपीने अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचण्याआधी तिच्यावर 20 वेळा चाकूने वार केले. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेली अल्पवयीन मुलगी ही शाहबाद डेअरी परिसरातील जे.जे.कॉलनीमधील रहिवासी होती. रस्त्यावर ही अल्पवयीन मुलगी रक्ताच्या थारोळ्यात सापडली असल्याचे दिसून आले. पीडित अल्पवयीन मुलगी ही रस्त्यावर जात असताना आरोपीने तिला हटकले आणि तिच्यावर हल्ला केला. आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी हे दोघही एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. मात्र, त्यांच्या किती वर्षांपासूनची ओळख होती, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 






शनिवारी दोघांमध्ये झाला होता वाद...


दिल्ली पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. शनिवारी त्यांच्यात वाद झाला होता. रविवारी, अल्पवयीन मुलगी आपल्या ओळखीतील एका मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत जात होती. त्यावेळी आरोपीने तिला रस्त्यात अडवले आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले.


मृत मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाहबाद पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. जवळपास सहा पथके चौकशीसाठी नियुक्त करण्यात आली. 


दिल्ली महिला आयोगाने घेतली दखल 


या धक्कादायक घटनेची दखल महिला आयोगाने घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी म्हटले की, हादरवून सोडणारी अशी घटना यापूर्वी पाहिली नाही. दिल्लीत महिला आणि मुलींच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुन्हा अशाप्रकारचे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही, असे बदल पोलीस व्यवस्थेत करण्याची आवश्यकता आहे, असे मालिवाल यांनी म्हटले.