मुंबई : अलिकडे 'सिम स्वॅप'च्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. कांदिवलीतील एका व्यापाऱ्याचे सिम स्वॅप करून सायबर चोरट्यांनी तब्बल 7 कोटी 42 लाखाहून अधिक रक्कम परस्पर इतर खात्यांवर वळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीबाबत कुठलीही कल्पना व्यापाऱ्याला नव्हती. फोन लागत नसल्याबाबत ज्यावेळी मित्र-मैत्रिणींकडून सांगण्यात आले. त्यावेळी व्यापारी संबधित सिमकार्ड गॅलरीत गेल्यानंतर त्यांचे सिम हे हॅक झाल्याची माहिती मिळाली. यानंतर व्यापाऱ्याने आपले बॅकेतील सर्व व्यवहार बंद केले. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी मोठी रक्कम चोरलेली होती.


कांदिवली परिसरात राहणारे तक्रारदार विकास गुप्ता यांचा 'स्टिल'चा व्यवसाय आहे. या व्यवसायाशी संबधित कंपनीच्या बॅक खात्याला त्यांचे मोबाइल फोन हे संलग्न होते. रविवारी 22 डिसेंबर रोजी विकास यांचे भाऊ वरूण गुप्ता यांचा फोन अचानक नॉट रिचेबल येऊ लागला. फोन लागत नसल्याची माहिती गुप्ता यांच्या नातेवाईकानी दिली. बहुदा बिल भरले नसल्याने सिमकार्डवरची सेवा बंद केल्याचे गुप्ता यांना वाटले.


सिम हॅक झाल्याची माहिती 


दुसऱ्या दिवशी सोमवारी 23 डिसेंबर रोजी गुप्ता बंधू हे जवळील मोबाइल सिम कंपनीच्या कस्टमर केअरमध्ये गेले. तिथे केलल्या चौकशीत गुप्ता यांचे सिम कार्ड हॅक झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच तातडीने या नंबरशी संबधित बॅक खातीही गोठवण्याचा सल्ला दिला. 


चार कोटींची रक्कम फ्रिज केली


गुप्ता बंधू तातडीने बॅकेत गेले असता रविवारी रात्री त्यांच्या खात्यातून तब्बल 7 कोटी 42 लाखाहून अधिक रक्कम ही इतर 85 खात्यात वळवण्यात आल्याची माहिती समोर आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्ता बंधुंनी तातडीने बँक खात्यावरील सर्व व्यवहार बंद करत बीकेसीतील सायबर पोलिस ठाणे गाठले. सायबर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तपास सुरू केला. सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर गुप्तांच्या खात्यातून ज्या विविध खात्यावर पैसे गेले होते त्यातील 4 कोटींची रक्कम ही फ्रिज केली.


गुप्ता यांच्या मोबाइलचा ताबाच आरोपींनी मिळवल्यामु़ळे होणाऱ्या व्यवहाराबाबतचे OTP त्याच्या मोबाइलवर न येता आरोपींना ते मिळत होते. त्याचाच मदतीने आरोपींनी अवघ्या काही मिनिटात गुप्ता यांचे खाते रिकामी केले आणि याची जराही कल्पना गुप्तांना होऊ दिली नाही. रविवार असल्याने बॅकांही बंद. अशात मध्यरात्री चोरी केल्यास गुप्ता यांना या चोरीबाबत कळणार नाही या अनुषंगाने ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.


Sim Swap Scam :  सिम स्वॅपिंग स्कॅम म्हणजे आहे?


सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून स्कॅमर्स मोबाइल मधील सिम कार्डचा अ‍ॅक्सेस मिळवतात. त्यानंतर यूजरच्या फोनचा सर्व कंट्रोल हा त्याच्या हातात जातो. यूजरला येणारे फोन मेसेज हे देखील स्कॅमर्सपर्यंत पोहचतात. त्यामुळे पैसे काढताना येणारा OTC हा स्कॅमर्सला मिळाली की, ते युजरच्या डिटेल्ससह पैसे चोरी करता येतात. अनेकदा स्कॅमर यूजरच्या सिमचा अ‍ॅक्सेस मिळाला की युजरचे मित्र आणि नातेवाईकांकडूनही पैसे मागतात. सध्या टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन आवश्यक असल्यामुळे एखाद्या स्कॅमरला तुमच्या सिम कार्डचा अ‍ॅक्सेस मिळाला तर तुमचं संपूर्ण अकाऊंट रिकामं होईल.


नागरिकांनी काय करायला हवे?


प्रत्येक बँक अकाऊंटला इमेल अलर्ट लावण्याची गरज आहे. तसंच अचानक सिम बंद झालं तर बँकेला त्याचा अकाऊंटशी संबंध तोडण्यास सांगितलं पाहिजे. सिम स्वॅपिंगचे प्रकार साधारणपणे शुक्रवारी, शनिवारी किंवा सलग सुट्यांच्यावेळी घडतात. तेव्हा सुटी असल्यामुळे बळी पडलेल्या लोकांना मोबाइल गॅलरी तसंच बँकांशी संपर्क करण्यात अडथळा येतो. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये सिम बंद पडल्यास वेगाने पावलं उचलण्याची गरज आहे.