Crime News: गु्न्हे शाखेच्या सायबर विभागाने कुरारमधील कर्ज अॅप प्रकरणात एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थानमध्ये ही कारवाई केली आहे. कर्ज फेडण्यासाठी येणाऱ्या धमक्यांना कंटाळून एकाने आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबईतील कुरारमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
झटपट कर्ज मिळवण्यासाठी काही अॅप आले आहेत. कर्जाची परतफेड न केल्यास बदनामी करण्याची धमकी संबंधितांकडून दिली जाते. त्याशिवाय इतर मार्गाने बदनामी करण्याची धमकी दिली जाते. अशाच एका अॅपवरून घेतलेल्या कर्जाला कंटाळून संदीप कोरेगावकर या व्यक्तीने 5000 रुपयांचे कर्ज अॅपवरून घेतले होते. मात्र, संबंधितांकडून संदीपच्या मित्रांना आणि नातेवाईकांना व्हॉट्स अॅप पोस्ट आणि फोटो पाठवून बदनामी केली जात होती. त्यानंतर या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
त्यानंतर कुरार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 420 (फसवणूक) आणि 500 (बदनामी करणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (डी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी या गु्न्ह्याचा समांतर तपास सुरू केला.
सायबर पोलिसांनी राजू भंवरलाल खडाव ( वय 22 ) याला अटक केली. सायबर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून सिमकार्डसह ५ मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलचा वापर मृतकाला त्रास देण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी आरोपी राजू याला राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील भोपाळगड या गावातून अटक केली.
पोलिसांनी तपास पथकाने मोबाईल क्रमांकचे whatsapp कॉलची माहिती तपासली. ज्याचा वापर मृत व्यक्तीला त्रास देण्यासाठी केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी आयपी अॅड्रेसची माहिती घेतली. व्हॉट्सअॅपवरून जमा केलेल्या वरील आयपीसमोर नवीन मोबाइल क्रमांक दिसून आला. त्या मोबाइल नंबरचे सीडीआर काढण्यात आले. या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर आरोपीचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या मदतीने आरोपी राजू भंवरलाल खडाव याला अटक करण्यात आली. तपास पथकाने छेडछाडीची पोस्ट करण्यासाठी वापरलेले मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले. आरोपीला कुरार पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आता या प्रकरणाचा तपास कुरार पोलीस करत आहेत.