Gondia Crime News : पत्नी, सासरा आणि मुलगा झोपेत असताना एका व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गोंदियात घडली आहे. या घटनेत सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीची पत्नी आणि मुलगा 90 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. किशोर शेंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर देवानंद मेश्राम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. 


गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या सुर्याटोला येथे जावयाने (किशोर शेंडे) आपल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. देवानंद मेश्राम (52) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे (35) व मुलगा जय किशोर शेंडे ( 5 )  हे 90 टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले आहे. आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे हा घटनास्थळावरून फरार झाला होता. 


आरोपी किशोर शेंडे यांच्यासोबत दररोज भांडण होत असल्याने व मारहाण होत असल्याने पत्नी आरती हिने सासर सोडून गेल्या वर्षभरापासून माहेरी सुर्याटोला येथे राहत होती. या दरम्यान पोटापाण्याची सोय व्हावी याकरीता एका रुग्णालयात ती नोकरी करीत होती. घटनेच्या दिवशी जेवण करुन आरोपीचे सासरे देवानंद मेश्राम हे बाहेर व पत्नी व मुलगा आत झोपले होते. त्यावेळी आरोपीने आधी सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर आत झोपलेल्या पत्नी व मुलाच्या अंगावरही पेट्रोल टाकून आग लावून पसार झाला होता. याप्रकरणात रामनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. 


आरोपीला पोलिसांनी केली अटक 


सूर्याटोला परिसरात या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत  रामनगर पोलीस निरीक्षक यांनी वरिष्ठांना लागलीच घटनेची माहिती कळवली. जावयानेच सासरा, पत्नी व मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून पळून गेला असल्याची बाब लक्षात येताच वरिष्ठांनी आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस पथकाने तिरोडा डी. बी. पथकातील पोलिसांच्या मदतीने आरोपी किशोर शेंडे याला बेड्या ठोकल्या. आरोपीला या घटनेसंदर्भात विचारपूस केली असता सासरे, पत्नी व मुलाचे अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याच्या कबुली दिली आहे. या घटनेने गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.