Crime News : डोंबिवलीत धुमाकुळ घालणाऱ्या दोन सराईत चोरांना गजाआड मानपाडा पोलिसांनी केलं आहे. मानपाडा पोलिसांनी कल्याण डोंबिवली परिसरातील 50 हून अधिक सीसीटीव्ही तपासले होते. अखेर पोलिसांनी सापळा रचत या दोन्ही साखळी चोरांना अटक केली. रमेश पालीवाल, महेश जठ अशी या आरोपींची नावे आहे. या दोघांविरोधात पालघर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 29 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत पोलिसांनी  कल्याण डोंबिवली मधील विविध पोलीस ठाण्यातील   9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून 15  लाख 25 हजार रूपये किमतीचे 305 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली होंडा कंपनीची दुचाकी जप्त केली आहे. फक्त मौज मस्ती करण्यासाठी हे दोघेजण दुचाकीवरून साखळी चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. 


कल्याण डोंबिवली परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना लुटणे, महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चोरट्यांचा शोध सुरु केला होता. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासत कल्याण-डोंबिवली परिसरात बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. 


या दरम्यान भिवंडीमधील दोन साखळी चोर रात्रीच्या वेळी आपल्या मोटार सायकलवरून कल्याण डोंबिवलीत दाखल होऊन  जेष्ठ नागरिकांना व  महिलांना लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून फरार होत असल्याचे आढळून आले. या चोरांना गजाआड करण्यासाठी  झोन 3  चे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ व एसीपी जय मोरे व मानपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी 18 जणांचे पथक तयार केले होते. या पथकाने तब्बल एक महिना या चोरांवर पाळत ठेवली. 


आरोपी रमेश पालीवाल, महेश जठ या दोघांना मानपाडा पोलिस स्थानकाच्या परिसरात पोलिसांनी रंगेहात पकडले. या दोघांविरोधात पालघर ,ठाणे ,कल्याण डोंबिवली परिसरातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल 29 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत मानपाडा पोलिसांनी नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत.