औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सिडकोतल्या उच्चभ्रू वसाहतीतील एका प्राध्यापकाचा गळा चिरून निर्घृण खून झाल्यानं औरंगाबाद हादरलं आहे. सिडकोमध्ये एका रात्रीतच दोघांचा खून झाल्याने पुन्हा एकदा औरंगाबाद शहर असुरक्षित असल्याचं अधोरेखित झालंय.
औरंगाबाद शहरातल्या सिडको एन 2 या उच्चभ्रू वस्तीतल्या या घरात रात्री प्राध्यापक राजन शिंदे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. सकाळी कुटुंबातील सदस्य झोपेतून उठल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात राजन शिंदे यांना पत्नी आणि कुटुंबायांनी पाहिले. त्यानंतर वाऱ्यासारखी माहिती शहरभर पसरली. पोलिसांचे पथक तातडीने पोहचून तपास सुरू केला. सकाळी आठ वाजल्यापासून पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्यासह शहरातले डीसीपी, एसीपी, क्राईम ब्रँच यांनी चौकशी सुरू केली. मात्र अजून तपास सुरू आहे, तीन वेगवेगळ्या दिशेने आमचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहाटे साडेपाच वाजता राजन शिंदे यांच्या घरात रडण्याचा आवाज येताच सिडको एन 2, ठाकरेनगरमधील लोक धावत पळत घरी पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात असताना त्यांना पाहिल्यानंतर धक्काच बसला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. कपाळावर सुद्धा वार असल्यामुळे संपूर्ण चेहरा रक्ताने माखून गेला होता. इतकंच नाही तर खून करणाऱ्यांनी क्रूरपणे दोन्ही हाताच्या मनगटावर वार करून हाताच्या शिरा तोडल्या होत्या. कुटुंबातील सदस्य उठण्याअगोदर त्यांचा मुलगा उठला होता, असं आजूबाजूंच्या लोकांचं म्हणणं आहे. उठल्यानंतर तो चारचाकी कार काढून जवळ असलेल्या एमआयटीमधून रुग्णवाहिका आणण्यासाठी गेला. त्याच्या गाडीला धडक लागल्यानंतर त्यांनी तिथेच गाडी सोडली आणि रुग्णवाहिका घेऊन घरी पोहोचला. तोपर्यंत लोक जमले होते. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला.
पोलिसांची मोठी टीम सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत घरातच ठाण मांडून होती. मात्र तपास सुरू असल्याचं सांगून खून कोणी का केला याचे उत्तर मात्र पोलिसांनी सांगितलं नाही. त्यामुळे घरात घुसून खून झालाच कसा असा प्रश्न औरंगाबादकरांना पडलाय. इतकच काय ही घटना घडण्याच्या केवळ पाच तासापूर्वी सिडकोमध्येच भर रस्त्यावर दारूच्या दुकानाजवळ खून झाला. त्यामुळे औरंगाबाद शहर सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.