नागपूर :  कोरोना काळात भाडेकरूंना घर मालकांनी त्रास देऊ नये अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली होती. मात्र, काही भाडेकरू त्याचा अवाजवी फायदा उचलत असल्याचे समोर आले आहे. नागपुरात घर भाड्याने घेणाऱ्या एका भाडेकरूने दर महिन्याला घराचे भाडे देणे तर सोडाच... उलट घरमालकालाकडून घर रिकामे करण्यासाठी पैसे वसूल केल्यानंतर घर मालकाकडून लाखोंची खंडणीही मागितली. घरमालकाने ती देण्यास नकार दिल्यानंतर वारंवार शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.  भाडेकरूंच्या या जाचाला कंटाळून अखेर मुकेश रिझवानी नावाच्या घर मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी मुकेश यांनी भाडेकरूंनी दिलेल्या सर्व त्रास एका व्हिडिओमध्ये सांगत तो व्हिडिओ अनेकांना पाठवला आणि त्यानंतर आत्महत्या केली.


नागपुरातील जरीपटका परिसरातील कस्तुरबानगर येथील रहिवासी मुकेश रिझवानी यांनी सहा ऑक्टोबर रोजी राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी मुकेश यांनी त्यांच्या भाडेकरूवर गंभीर आरोप लावत तो व्हिडिओ व्हायरल केला होता.


मुकेश रिझवानी यांनी आरोपी राजेश सेतीया ला मे 2019 पासून घराच्या काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या. परंतु, सेतीया त्यांना नियमित घरभाडे देत नव्हता. एकदा घरभाडे मागण्यासाठी मुकेश रिझवानी हे राजेश सेतीयाकडे गेले असता आरोपी राजेश  सेतीया आणि त्याचा भाऊ मूलचंद सेतीया यांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि साडेचार लाखांची खंडणी मागितली. घर रिकामे झाल्यास कायमची कटकट सुटेल म्हणून मुकेश रिझवानी यांनी सेतीयाला काही पैसेही दिले. मात्र, त्यानंतर आरोपी राजेश सेतीयाने त्यांना आणखी  पैसे मागितले. आरोपींनी मुकेश रिझवानी यांना वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. याच त्रासापोटी रिझवानी यांनी गळफास घेऊन 6 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली.


आत्महत्येपूर्वी त्यांनी भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. याप्रकरणी  जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.. घटनेनंतर दोन्ही आरोपी भाऊ फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान रिझवानी कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


कोरोना काळात अनेकांचे रोजगार व्यवसाय ठप्प झाल्यामुळे स्वतः पंतप्रधान मोदींनी घर मालकांनी भाडेकरूंना त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, काही भाडेकरू घरमालकांच्या चांगुलपणाचा अवाजवी फायदा उचलत त्यांना आत्महत्येच्या दारापर्यंत पोहोचवत आहेत का असा प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाला आहे.