Dhule Crime News :  भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर (Gajendra Ampalkar) यांच्या विरोधात पोक्सोअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने (Court) दिले आहेत. तर चार जणांविरोधात इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन पीडितेच्या वतीने तिच्या बहिणीने कोर्टात धाव घेतल्याने हा आदेश पारित झाला आहे. यामुळे धुळ्यात मोठी खळबळ उडाली आहे. 


या घटनेची सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन मुलीचे लहान बहिण व भाऊ हे अंपळकर यांच्या हर हर महादेव या व्यायाम शाळेत कुस्ती शिकण्यासाठी जात असत. या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रितिका उर्फ दादू राजेंद्र राजपूत या पीडित युवतीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘तू मला आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचे’ असे सांगून आग्रह धरला. ‘माझे ऐकले नाही तर तुझ्या परिवाराला जीवे ठार मारेल’ अशी धमकी ही दिली.


पोलिसात न जाण्याची दिली धमकी 


10 जानेवारी रोजी याच कारणावरून पीडितेसह तिची आई व कुटुंबातील सदस्यांना रस्त्यात अडवून पुन्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच पीडित युवतीशी अंगलट येण्याचाही प्रयत्न केला. आरडाओरड करून स्वतःची सुटका करून घरी जात असताना गजेंद्र आंपळकर यांनी पोलिसात न जाण्याची धमकी दिली.


पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही


मात्र तरीही पीडित युवतीची बहीण व तिची आई दोन्ही भावांसह चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट कल्याणी अंपळकर यांनी दाखल केलेली तक्रार नोंदवून घेत फिर्यादी, तिची आई व दोन्ही भावांना अटक केली. त्यामुळे त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले. या गुन्ह्यात फिर्यादीच्या वडिलांचे ही नाव गोवण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.


कोर्टामार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश


बाहेर आल्यानंतर पुन्हा चाळीसगाव रोड पोलिसांना विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी नकार दिल्याने या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने खातर जमा करून पोक्सोसह भा. दं. वी 354, 323, 504, 506 (2),143,147,148,149 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. संशयित आरोपीमध्ये हर हर महादेव व्यायाम शाळेचा कुस्ती प्रशिक्षक दादू राजपूत, गजेंद्र महादेव अंपळकर, कल्याणी सतीश अंपळकर, सुहास सतीश अंपळकर, जतिन उर्फ अजय आव्हाळे यांचा समावेश आहे. कोर्टामार्फत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळाल्याने सामाजिक व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


आणखी बातम्या 


Kanhaiya Kumar : आधी हार घातला, नंतर कानशिलात लगावली, दिल्लीत कन्हैय्या कुमारवर दोन जणांचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल