मुंबई : मुंबईच्या सत्र न्यायालयाने अलीकडेच कुलाबा भागातील एका 46 वर्षीय व्यक्तीला 'लव्ह अॅग्रीमेंट' च्या आधारे अटकपूर्व जामीन मंजूर केला.  त्या आरोपीवर 29 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पण आपण एकत्र राहत होतो आणि त्यासाठी लव्ह अॅग्रीमेंट केल्याचं आरोपीकडून युक्तीवाद करण्यात आला. महिला आणि आरोपींमध्ये झालेल्या कराराच्या अटी वाचून न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. 


आरोपीने त्याच्यामध्ये आणि पीडितेमध्ये झालेल्या 11 महिन्यांच्या "प्यार का अग्रीमेंट" प्रत न्यायालयासमोर ठेवली आणि दावा केला की या करारावर दोघांनी स्वाक्षरी केली होती. दोघांमध्ये झालेल्या या करारात सात अटी आहेत. जर ते शारीरिक संबंध ठेवतात तर पुरूषाला कोणत्याही प्रकारे जबाबदार धरले जाणार नाही अशी एक अट त्यामध्ये असल्याचा दावा पीडितेच्या वकिलाने कोर्टात केला.


लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप


पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला वृद्धाश्रमात काम करते तर आरोपी हा सरकारी कर्मचारी आहे. पीडितेने आरोप केला आहे की आरोपीने तिला लग्नाचे वचन दिले होते आणि त्याच्या पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेतल्याचा दावा केला होता. परंतु लग्न करण्याऐवजी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार करण्यात आल्याचा दावा पीडितेने केला. 


पोलिसांना दिलेल्या साक्षीमध्ये त्या महिलेने दावा केला आहे की, ती ऑक्टोबर 2023 मध्ये एका मित्राच्या मार्फत आरोपीला भेटली होती. जेव्हा ती पहिल्यांदा आरोपीच्या घरी गेली तेव्हा काही तासांच्या संभाषणानंतर तिला सांगण्यात आलं की तो व्यक्ती घटस्फोटित आहे आणि त्याला एक मुलगा आहे. यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी संमतीने शारीरिक संबंध ठेवले.


फिर्यादीने सांगितले की, ते फोनवर संपर्कात राहिले आणि काही दिवसांनी आरोपीने महिलेला त्याच्या मित्रांसह अलिबागला जाण्याची विनंती केली. या पाच दिवसांच्या सहलीत त्यांच्यात पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.


गर्भपाताच्या गोळ्या दिल्या


महिलेने पुढे दावा केला की आणखी काही भेटीनंतर, आरोपीने सांगितले की त्याच्याकडे तिचे आक्षेपार्ह फोटो आहेत. जर तिने भेटणे थांबवले तर तो सार्वजनिक करेल. महिलेने पुढे दावा केला की ती गर्भवती राहिली होती. जेव्हा तिने आरोपीला माहिती दिली तेव्हा त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या.


घटस्पोट न झाल्याचं समोर आलं


पीडित महिलेने तक्रारीत पुढे म्हटले आहे की, जानेवारी महिन्यात तिला आरोपीने आपल्या घरी बोलावले होते. तिथे गेल्यावर तिला तिथे एक महिला दिसली जिने स्वत:ची ओळख आरोपीची पत्नी असल्याची दिली. यानंतर फिर्यादीच्या लक्षात आले की, विवाहित असूनही आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन तिची फसवणूक केली.


या प्रकरणी महिलेने 23 ऑगस्ट रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. तेथून कराराच्या आधारे त्याला 29 ऑगस्ट रोजी जामीन मिळाला.


कराराच्या प्रतीमध्ये काय होते?


एबीपी न्यूजसोबतच्या हाती लागलेल्या या कराराच्या कॉपीमध्ये काही गोष्टी समोर आल्या आहेत.



  • 1 ऑगस्ट 2024 ते 30 जून 2025 पर्यंत पुरुष आणि महिला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतील असे लिहिले आहे.

  • या कालावधीत ते एकमेकांविरुद्ध लैंगिक छळाचा कोणताही गुन्हा दाखल करणार नाहीत आणि शांततेत वेळ घालवतील, अशी दुसरी अट आहे.

  • तिसरी अट सांगते की ती स्त्री पुरुषाच्या घरी राहणार आहे आणि जर तिला त्याचे वागणे मान्य नसेल तर एक महिन्याची नोटीस देऊन ते कधीही वेगळे होऊ शकतात.

  • चौथ्या अटमध्ये असे म्हटले आहे की, महिलेचे नातेवाईक त्यांच्यासोबत राहताना त्यांच्या घरी येऊ शकत नाहीत.

  • पाचव्या अटीनुसार स्त्रीने पुरुषाला कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास देऊ नये.

  • सहावी अट सांगते की जर स्त्री गर्भवती झाली तर पुरुषाला जबाबदार धरले जाणार नाही आणि त्याची संपूर्ण जबाबदारी स्त्रीची असेल.

  • सातव्या अटीनुसार, छळामुळे आरोपीला मानसिक त्रास झाला आणि त्याच्या आयुष्यावर परिणाम झाला, तर महिला जबाबदार असेल.


आरोपीचे वकील सुनील पांडे म्हणाले की, माझ्या अशिलाला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे, ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही रिलेशनशिपमध्ये राहण्यास होकार दिल्याचे या करारावरून स्पष्ट झाले आहे. 


ही बातमी वाचा: