दिल्ली : आपल्या गर्लफ्रेंडला भेटवस्तू देण्यासाठी लोक काय करतील याचा काही भरवसा नाही, पण नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी असं काही केलं की, त्याची आईला मोठा धक्का बसला. आपलं मूल एवढ्या टोकाला जाईल याची कल्पनाही या आईनं केली नव्हती. मुलाने केलेलं कांड पाहून आईच्या तोंडच पाणी पळालं. ही घटना समोर आल्यावर पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.
गर्लफ्रेंडसाठी नववीतील मुलगा बनला चोर
नववीच्या वर्गातील विद्यार्थ्याने गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी घरातच चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीतील मुलाला प्रेयसीला आयफोन (iPhone 15) गिफ्ट करायचा होता, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने घरातून आईचे दागिने चोरण्याचं ठरवलं. अल्पवयीन मुलाने आईचे दागिने चोरुन ते विकले आणि गर्लफ्रेंडसाठी आयफोन घेतला. या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे.
घरातून आईच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी
दिल्लीमधील ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका अल्पवयीन मुलाला आपल्या प्रेयसीला तिच्या वाढदिवसानिमित्त आयफोन गिफ्ट करायचा होता म्हणून त्याने घरातून त्याच्या आईचे दागिने चोरले. यानंतर त्याने दागिने विकून आयफोन विकत घेतला. अल्पवयीन आरोपीने आयफोन खरेदी केला होता, पण लवकरच त्याचं पितळ उघड पडलं.
आईचे दागिने विकून गर्लफ्रेंडला गिफ्ट दिला आयफोन
पोलिसांनी अल्पवयीन मुलगा आणि दागिने विकत घेणाऱ्या एका व्यक्तीला दागिन्यांसह पकडलं. कमल वर्मा असं अटक करण्यात आलेल्या आरोपी ज्वेलरी व्यावसायिकाचं नाव आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलगा आणि ज्वेलर्सकडून आयफोन आणि विक्री केलेले दागिने जप्त केले आहेत. अल्पवयीन मुलगा हा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे.
नेमकं काय घडलं?
दिल्लीतील नजफगढ भागात ही घटना घडली आहे. 3 ऑगस्ट रोजी एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला असता महिलेच्या मुलानेच हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी चौकशी केली असता आढळून आलं की, अल्पवयीन मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडला आयफोन (iPhone 15) भेट द्यायचा होता, पण त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. त्यामुळेच त्याने आईचे दागिने चोरले. ते एका सोनाराला विकले आणि त्याच पैशातून त्याने आपल्या प्रेयसीसाठी फोन विकत घेतला. पोलिसांनी दोन सोनारांकडून दागिनेही जप्त केले असून एका सोनाराला अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :