Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एका शुल्लक कारणावरून चक्क चाकू हल्ला करण्यात आला आहे. आम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची तरच येथे गाडी लावायची, असे म्हणत पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत पाणीपुरी विक्रेता जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तर या प्रकरणी तिघांवर उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापनगर येथे एक पाणीपुरीवाला आपला गाडा लावून, व्यवसाय करायचा. दरम्यान 30 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सय्यद शहजाद सय्यद अल्लू (रा. फुलेनगर, उस्मानपुरा), शेख अन्सार ऊर्फ इल्ली शेख सत्तार (रा. शहानूरवाडी) आणि शेख शाहरुख ऊर्फ जॉकी शेख वाहिद (रा. उस्मानपुरा) या तिघांनी पाणीपुरी वाल्याला आम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची तरच येथे गाडी लावायची, असे म्हणत धमक्या दिल्या. तसेच त्या पाणीपुरीवाल्यास शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. तेव्हा या पाणीपुरीवाल्याचे काका पूरणसिंह यादव (रा. शहानूरवाडी) हे भांडण सोडवण्यास आले. तेव्हा या तिघांनी त्यांना पकडून चाकूने भोसकले. त्यामुळे या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'तू मेरे साथ क्यू नही रहेता' म्हणत चाकूने वार
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत बायजीपुऱ्यात देखील एकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. 'तू मेरे साथ क्यूँ नही रहेता, जादा मस्ती में आया क्या, तू सोहेल बागवान के साथ क्यूँ रहता है, तुझे और सोहेल को जान से मार दूँगा' असे म्हणून आमेर खान पाशु खान (रा. बायजीपुरा) याने फिर्यादी शेख अबुजर शेख अय्युब (रा. हर्सल) यांच्या मानेवर, हातांवर आणि पाठीवर चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना 27 एप्रिल रोजी बायजीपुऱ्यात घडली. याप्रकरणी 1 मे रोजी जिन्सी ठाण्यात आमेरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा जणांकडून तरुणावर हल्ला
संभाजीनगर शहरात आणखी एकावर हल्ला करण्यात आल्याची घटना देखील समोर आली आहे. "तुझ्या मुलाला बोलावून घे, त्याने चूक केली आहे. त्याला माफी मागायला लावायची आहे,” असे म्हणत दहा जणांच्या टोळक्याने एकावर जीवघेणा हल्ला केला. यात फिर्यादी आरेफ देशमुख (रा. कटकट गेट) यांचा मुलगा अबरार हा गंभीर जखमी झाला. तर त्यांचा मेहुणा जावेद खान यासही चाकू लागला. याप्रकरणी आरेफ यांच्या तक्रारीवरून हुसेन खान ऊर्फ बब्बु, सैफ अब्बास खान, शहबाज हुसेन खान, हुसेन खानचा भाचा सोहेल, फैसल, फुरखान, नातेवाईक साद, रेहान, हारुण यांच्यासह हुसेनच्या जावयाच्या विरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
आधुनिक लखोबा! पहिली सोडली, दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहत असतानाच तिसरी जाळ्यात ओढली