Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : पती-पत्नीचे किरकोळ कारणावरून होणारे वाद काही नवीन नाही. अनेकदा पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नी माहेरी निघून जाते. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) एपीआय कॉर्नर येथील नालंदा कॉम्प्लेक्समध्ये पती-पत्नीच्या वादानंतर जे काही घडलं त्याची चर्चा जिल्हाभरात पाहायला मिळत आहे. कारण नवरा-बायकोच्या किरकोळ वादानंतर पत्नीने अक्षरशः पतीचं अख्ख घरच पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शेवटी अग्निशमन दलाचे बंब आल्यावर आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत वन बीएचके फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला असून, आगीची झळ अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांनाही बसल्याचे पाहायला मिळाले. डॉ. गोविंद वैजवाडे असे पतीचे नाव असून, विनिता वैजवाडे असे घर पेटवून देणाऱ्या पत्नीचे नाव आहे. 


डॉ. गोविंद वैजवाडे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, 2019 मध्ये गोविंद आणि विनिता यांचा विवाह झाला. विनिता या नक्षत्रवाडीतील एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. लग्नाला चार वर्षे झाली, मूलबाळ नाही. अशात दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून एका विशिष्ट कारणामुळे वाद सुरू होते. दरम्यान, 28 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यामुळे शेजारी राहणारे मनोज मर्दा व त्यांच्या पत्नीने घरी येवून विनिता यांची समजूत घातली. अखेर रात्री दीड वाजता मर्दा यांनी विनिता यांना त्यांच्या सांगण्यावरून एका हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडले.  मात्र, दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता विनिता परत नालंदा कॉम्प्लेक्समधील घरी आल्या. घरी येताच जोरजोरात ओरडाओरड करू लागल्या. त्यामुळे गोविंद वैजवाडे फ्लॅटमधून खाली आले. या काळात विनिता यांनी घरात जाऊन आपली बॅग भरली आणि खाली येतांना घर पेटवून दिले. 


शेवटी फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळवले.


विनिता बॅग भरून खाली आल्यावर गोविंद वैजवाडे वरती फ्लॅटकडे निघाले. याचवेळी शेजारी राहणाऱ्या मर्दा यांनी विनिताने घरात आग लावल्याचे सांगितले. त्यानंतर तात्काळ फायर ब्रिगेडला याची माहिती देण्यात आली. तोपर्यंत घरातील सोफासेट, हायर कंपनीचे दोन फ्रीज, एसी, टीव्ही. कुलर, लाकडी कपाट, पलंग, मोठे शोकेस, त्यामधील वस्तू, घराचे ओरिजनल कागदपत्रे, डिग्री प्रमाणपत्र, कपडे आदी वस्तू जळून गेली होती. शेवटी फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी डॉ. गोविंद वैजवाडे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीसांनी विनिता वैजवाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


खोड्या करतो म्हणून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवलं, कोल्ड्रिंक्समधून विषारी पावडर पाजलं