छत्रपती संभाजीनगर : अनेकदा चोरी झाल्यावर किंवा आपली फसवणूक झाल्यावर आपण पोलीस ठाण्यात (Police Station) धाव घेऊन तक्रार दाखल करत असतो. मात्र, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात आगळावेगळा प्रकार समोर आला असून, तक्रारदार पोलीस अन् आरोपीही पोलिसच आहे. विशेष म्हणजे चोरीही पोलीस ठाण्यातच झाली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून सहायक फौजदारावर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील छावणी पोलीस ठाण्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. राजेंद्र नारायण होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहायक फौजदार रामदास संताराम गायकवाड (वय 55 वर्षे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होळकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “रामदास संताराम गायकवाड हे पोलीस स्टेशन छावण येथे नेमनुकीस असुन, पोलीस ठाण्यातील मोहरील ड्युटी करीत असतात. दरम्यान, मोहरील पदाचा गैरवापर करुन तत्कालीन पोलीस निरीक्षक यांचा विश्वास संपादन करुन 30 एप्रिल 2021 रोजी 3 लाख 4 हजार 819 रुपये शासकीय बँक खात्यामधुन रोखीने काढुन घेतले. त्याची शासकीय अभिलेखावर नोंद न घेता सदरची रक्कमेचा हिशोब ठेवला नाही. तसेच शासकीय अभिलेखामध्ये ओव्हर रायटिंग करुन शासनाची दिशाभुल करुन फसवणुक केली. तसेच, सदर रक्कम ही स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन नमुद रकमेचा अपहार केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात कलम 420,406,409 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 


पोलीस दलात चर्चेला उधाण...


पोलीस ठाण्यात रोज अनेक फसवणुकीचे प्रकरण येत असतात, मात्र चक्क पोलीस दलाचीच फसवणूक केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणारा देखील पोलीस कर्मचारीच आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच शहरातील पोलीस दलात याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. स्वतः च्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करुन 3 लाख 4 हजार 819 रुपये शासकीय बँक खात्यामधुन रोखीने काढुन गायकवाड यांनी गैरप्रकार केला आहे.


असा झाला उलगडा...


प्रत्येक पोलीस ठाण्यात मोहरी फंडाचा वापर पोलिस ठाण्याचा वेगवेगळ्या कामासाठी, लाइट बिलसाठी  केला जातो. छावणी पोलीस ठाण्यातील मोहरील ड्युटीवर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, नवनियुक्त पोलिस निरीक्षक होळकर यांनी वार्षिक अहवाल तपासला असता त्यांना त्यामध्ये अनियमितता आढळून आली. त्यांनी अधिक माहिती घेतली असता 3 लाख 4 हजार 819 रुपये शासकीय बँक खात्यामधुन रोखीने काढून तो कुठे वापरण्यात आला याची महिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरात दृश्यम पार्ट- 2! मृतदेह शोधण्यासाठी खोदले आठ खड्डे अन् 14 महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा