बेळगाव: घर बांधताना ते कसं असावं, त्याची दिशा काय असावी या संबंधीचा वास्तूशास्त्राचा विचार अलिकडे अनेकजण करतात. त्यासंबंधी मार्गदर्शन करणारे अनेक तज्ज्ञ आज नावारुपास आले आहेत. 'सरल वास्तू'चे संस्थापक डॉ. चंद्रशेखर गुरुजी हे त्यापैकीच एक. भारतीय सेनेमध्ये दाखल व्हावं असं स्वप्न असणारा युवक नंतरच्या काळात वास्तूशास्त्रज्ञ बनतो, हा त्यांचा प्रवासही रंजक असाच आहे. एकदा त्यांना सुंदर घराचे स्वप्न पडलं आणि 'सरल वास्तू' ही संस्था आकारास आली. 


चंद्रशेखर गुरुजी यांची लहानपणापासूनच अध्यात्माकडे ओढ होती. आठ वर्षाचे असताना त्यांनी आपल्या गावातील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी वर्गणी गोळा करून जीर्णोध्दार केला होता. चौदा वर्षाचे असताना त्यांनी  भारतीय सेनेत दाखल होण्याची मनीषा बाळगली होती. पण नंतर आरोग्याच्या प्रश्नामुळे त्यांना ते जमले नाही. नंतर त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंग पदवी संपादन करून मुंबईत कॉन्ट्रॅक्ट व्यवसाय सुरू केला. 1995 साली शरण संकुल ट्रस्ट स्थापन करून सामाजिक कार्याला प्रारंभ केला.


स्वप्नाने दिशा बदलली
एक दिवशी चंद्रशेखर गुरुजींना सुंदर घराचे स्वप्न पडले. त्यामुळे त्यांनी वास्तूशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि हे शास्त्र दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन करण्यास प्रारंभ केला. यू ट्युबवर त्यांनी वास्तूशास्त्राचे व्हिडीओ अपलोड केले त्याला लोकांचा अलोट प्रतिसाद लाभला. अनेक वाहिन्यांवर त्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम देखील होत होते.


गुरुजींच्या मारेकऱ्यांना अटक
वास्तूशास्त्रामध्ये नावाजलेल्या चंद्रशेखर गुरुजींची आज हुबळी येथील एका हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. चरण स्पर्श करण्याच्या हेतूने जवळ आलेल्या व्यक्तीने त्यांची हत्या केली आणि पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत त्यांच्या मारेकऱ्यांना रामदुर्ग या ठिकाणाहून अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.


हे दोघेही चंद्रशेखर गुरुजी यांच्याकडे काम करत होते. गुरुजींनी वनजाक्षी आणि मंजुनाथ यांचा स्वतः पुढाकार घेवून विवाह केला होता. नंतर त्यांना प्लॉटदेखील दिला होता. 2019 पर्यंत हे गुरूजींच्याकडे काम करत होते. नंतर त्यांनी काम सोडले. काम सोडल्यावर गुरुजींनी त्यांच्याकडे प्लॉट परत करण्याचा तगादा लावला होता.