हुबळी: 'सरल वास्तू'चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजींच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा असे आदेश मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पोलिसांना दिले आहेत. आपण या संदर्भात हुबळी पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन त्यांना निर्देश दिले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. चंद्रशेखर गुरुजी यांची आज दोन अज्ञात व्यक्तींनी हुबळीतील एका हॉटेलमध्ये हत्या केली असून त्या संबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


चंद्रशेखर गुरुजींच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीसांनी या सर्व परिसरात नाकेबंदी केली आहे. हुबळीतील हॉटेलच्या लॉबीत दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजी यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. या गोंधळातच हल्लेखोर पसार झाले. हॉटेलमधील व्हिडीओच्या फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत.


 






चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये झालेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 


काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर गुरुजी यांच्या विरोधात काही कर्मचाऱ्यांनी आपल्या थकित पगारासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा यात काही सहभाग आहे का, या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. चंद्रशेखर गुरुजी हे तीन जुलैपासून हुबळीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्य करत होते. त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानिमित्ताने ते हुबळी येथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने तपासाचे निर्देश देत काही सूचना केल्या.