Maharashtra Shivsena Rebel Big Statement : शिवसेनापक्षप्रमुख (Shiv Sena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देवमाणूस पण त्यांच्या भोवतीचे लोक त्यांना काहीच सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता, असा खळबळजनक दावा बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच, संजय राऊत यांच्यावरही गायकवाड यांनी टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत हेच राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संपूर्ण शिवसेना संपवायला निघाले होते, असा खळबजनक आरोप संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केला आहे.
राज्यात गेले अनेक दिवस सत्तासंघर्ष सुरु होता. काल शिंदे-फडणवीस सरकारनं बहुमत सिद्ध केलं आणि अखेर या नाट्यावर पडदा पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह 21 जूनच्या रात्री बंड केलं होतं. त्यानंतर शिवसेनेतील एकापाठोपाठ एक आमदार शिंदे गटात सामील झाले आणि अखेर शिंदे गटानं भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं.
राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर पहिल्यांदाच आपल्या स्वगृही परतलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेतली आणि बंडाची कहाणी सर्वांसमोर मांडली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बंड का केलं? का टोकाची भूमिका गाठली हे स्पष्ट केलं.
ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्यावेळी आम्हालाही आनंद होता, पण कालांतरानं राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आम्हाला निधी मिळू दिला नाही, आमच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. त्यामुळे फुटलेले सर्वच आमदार व्यथित होत होते आणि त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असं गायकवाड यांनी सांगितलं. तसेच, पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले. संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संपूर्ण शिवसेना संपवायला निघाले होते, त्यामुळे सर्वजण व्यथित होते, असं गायकवाड म्हणाले. तसेच, शिवसेनेचं धनुष्यबाण लवकरच आम्हाला मिळणार असून येत्या दोन ते तीन महिन्यांत सगळं चित्र स्पष्ट होईल, असं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे देवमाणूस असून आजही सर्व आमदार त्यांचा आदर करतात. पण त्यांच्या भोवताली राष्ट्रवादी आणि काँग्रेस असल्यानं त्यांना सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता.
दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवलं. शिंदे गटातील बंडखोर आमदार, अपक्ष आणि भाजपचे आमदार यांनी नवं सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीचे आमदार वेळेत न पोहोचल्यानं 100 चा आकडाही गाठता आला नाही. शिंदे-फडणवीस सरकारला 164 सदस्यांचा पाठिंबा मिळाला तर मविआला 99 सदस्यांचा पाठिंबा होता. शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला गळाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला.