Chandrapur News : प्रेम विवाहाला नकार दिल्याने  चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक प्रकरण उघडकीस आल्याचा अजब आणि तितकाच रंजक प्रकार समोर आलाय. मूल तालुक्यातील उथळपेठ येथील ही घटना असून गावातील एका मुलाचे आणि मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे मुलाच्या वडिलांनी रितसर मुलीच्या वडिलांकडे जाऊन लग्नाची मागणी घातली. मात्र, मुलीच्या वडिलांनी या लग्नासाठी नकार दिला. सोबतच मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात मुलीला त्रास देत असल्याची पोलिसात (Chandrapur Police) तक्रार देखील केली. या प्रकारामुळे संतप्त मुलाच्या वडिलाने मुलीच्या वडिलाने 6 महिन्यापूर्वी केलेल्या वाघाच्या एका शिकारीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. या बातमीमुळे वन विभागसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  


प्रेमविवाहाला विरोध, वाघाच्या शिकारीचं बिंग फुटलं!


या प्रकरणातील संशयित आरोपी सुरेश चिचघरे यांनी आपल्या गावाजवळील शेतात मका पिकाची लागवड केली होती. या मका पिकांच्या संरक्षणासाठी त्यांनी ताराच्या कुंपणात करंट सोडला होता. या करंटचा धक्का लागून त्यात एका वाघाचा मृत्यू झाला. मात्र, कारवाईच्या भीतीपोटी या शेतकऱ्याने इतर सहकार्याच्या मदतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मृत वाघाचा मृतदेह शेतात खड्डा खणून पुरून टाकला. मात्र, कालांतराने या प्रकरणाची कुणकुण या प्रकरणातील प्रियकर तरुणाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना लागली होती.


अशातच मुलीच्या वडीलाने मुलगा आणि त्यांच्या वाडीलांसोबत गैरवर्तन केल्याच्या संतापातून या तरुणाच्या वडीलाने हे प्रकरण उघडकीस आणत एकच खळबळ उडवली. हे बिंग फोडल्याने वनविभागाने संशयित आरोपी सुरेश चिचघरे आणि त्याचा साथीदार श्रीकांत बुरांडे याला अटक केली आहे. सध्या वनविभाग या प्रकरणाचा सखोल चौकशी करत तपास करत आहे. मात्र, प्रेमविवाहाला नकार दिल्याने हे प्रकरण आता थेट वाघाच्या शिकारीपर्यंत जाऊन पोहचलय.


वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍यांचा मृत्यू 


सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण सावट आहे. राज्यातील बहुतांश धारणांनी तळ गाठला आहे. तर दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी अनेकांना मोठी पायपीट करावी लागते आहे. मानुष्याप्रमाणेच या उन्हाचा सामना वन्यजीवांनाही करावा लागतो आहे. अशातच पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्त्याकडे धाव घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अलिकडे वाघाने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे.


नुकतेच चंद्रपुरच्या बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता गावालगतच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाला आहे. वामन टेकाम असे या 59 वर्षीय गुराख्याचे नाव आहे. कोर्टीमक्ता गावालगतच्या जंगल परिसरात ते नेहमीप्रमाणे बकऱ्या चराईसाठी गेले असता वामन यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात होण्यापूर्वी वन विभागाच्या गस्तीवरील वनपथकाने हटकल्यानंतर देखील ते पुन्हा जंगलात शिरले होते. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असून वन विभाग आणि पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 


अशीच एक घटना चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील खानगाव येथे घडली आहे. वाघाच्या हल्ल्यात एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. स्वतःच्या शेतात पीक आणि जनावरांची देखभाल करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक या तरूणावर हल्ला केला. या घटनेत 34 वर्षीय श्रावण खोब्रागडे या तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा शौचास गेला असताना नाल्यानजीक वाघाने झडप घातली. त्यानंतर सकाळी श्रावण घरी न परतल्याने ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. कालांतराने त्यांचा मृतदेह आढळून आला. 


इतर महत्वाच्या बातम्या