Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा गोळीबाराच्या (Firing) घटनेने हादरला असून आज सकाळी बल्लारपूर शहरातील मालू कापड दुकानात गोळीबार करण्यात आलाय. सोबतच पेट्रोल बॉम्ब फोडून दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. गोळीबाराच्या या घटनेत दुकानातील कार्तिक साखरकर हा 32 वर्षीय कामगार जखमी झालाय. तर या कामगाराच्या पायाला गोळी लागली असून त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेतील आरोपी सध्या गजाआड होण्याआधीच आज बल्लारपूर शहरातील गांधी चौकात असलेल्या मालू कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकून गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्हा हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  


गोळीबारानंतर फोडले पेट्रोल बॉम्ब, नेमकं प्रकरण काय?


बल्लारपूर शहरातील मालू कापड दुकानात आज सकाळच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दुकानात काम करणारा कार्तिक साखरकर हा कामगार जखमी झाला आहे. मास्क आणि टोपी घातलेले तीन हल्लेखोर एका दुचाकीने दुकानात आले. सुरवातीला एका हल्लेखोराने दुकानाच्या प्रवेश द्वाराजवळ पेट्रोल बॉम्ब टाकला आणि त्यानंतर त्याच्या ईतर दोन साथीदारांनी दुकानाच्या आत प्रवेश करून गोळीबार केला. सुदैवाने या हल्यात दुकानातील ईतर कामगार सुखरूप आहेत. हा हल्ला दुकानातील मालक सुरेश मालू आणि सुनील मालू यांच्यावर करण्याचा बेत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.


वर्षभरापूर्वी याच दुकानाला लावण्यात आली होती आग


वर्षभरापूर्वी याच दुकानाला आग लावण्यात आली होती. यामध्ये हे दुकान जळून खाक झाले होते. त्या प्रकरणातील संशयित आरोपी सूरज गुप्ता मागील वर्षभरापासून फरार आहे. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वर्षभरापूर्वीच्या घटनेचा आजच्या गोळीबाराशी संबंध आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येत गुन्हेगारी वाढली असून पोलिसांपुढे ही वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आता मोठे आव्हान ठरले आहे. घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी भेट देत घटनेच्या तपास कार्याचा आढावा घेतला. मात्र हा गोळीबार करण्यामागे नेमकं कोण आणि त्यांच्या उद्देश काय असावा, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या