Ahmednagar Crime News : बीड जिल्ह्यातील माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन महिलांसह एक स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक कोटी रुपयांची खंडणी करण्यात आली होती. माजी आमदाराने त्यामधील 25 हजार रुपये दिल्याचे पोलीस तक्रारीतून समोर आले आहे. याप्रकरणाचा अहमदनगर पोलीस कसून तपास करत आहेत. आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन एका माजी आमदाराला ब्लॅकमेल करण्यात आले. त्या माजी आमदाराकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिलांसह एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने खंडणी मागितल्याबाबत अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान खंडणीच्या रकमेपैकी २५ हजार रुपये अहमदनगरमधील एका यू ट्यूब चॅनेलच्या पत्रकाराने स्वीकारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बीडमधील माजी आमदाराला लुबाडले -
संबंधित महिलांशी तडजोड करून देण्याची ऑफर देत बीड जिल्ह्यातील माजी आमदाराला खंडणी मागण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पैसे दिले नाही तर तुमचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे...दरम्यान अहमदनगरमध्ये युट्युब चॅनेलचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून अनधिकृत न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र बदनामीच्या भीतीने कुणी तक्रार देण्यास तयार होत नाही. याचाच फायदा घेत असे युट्युब चॅनेल्स चालवणाऱ्यांचे फावत असून प्रशासनाने सुमोटो अशा युट्युब चॅनेलच्या बोगस पत्रकारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
पोलिसांनी काय सांगितलं ?
दरम्यान, अशा पद्धतीने जर कुणी ब्लॅकमेलिंग करत असेल किंवा पैशाची मागणी करत असेल तर तातडीने अहमदनगर पोलीस किंवा कोतवाली पोलीस ठाण्याचे संपर्क साधावा असे, आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत संबंधित युट्युब चॅनलच्या बोगस पत्रकाराला आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. आरोपी कल्पना सुधीर गायकवाड , बांगर नामक महिला (संपूर्ण नाव माहिती नाही), इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर असं गुन्हा दाखल झालेल्या तिघांचे नाव आहे. यातील तोतया पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर याने पंचवीस हजार रुपये रक्कम संबंधित माजी आमदाराचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून स्वीकारल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. मात्र संबंधित तोतया पत्रकाराकडून असे प्रकार वारंवार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी संबंधितवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.