Buldhana Crime News : वृद्ध सासूनं दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून घर जावयानं वृद्ध सासूला आणि पत्नीला मारहाण केली. तसेच तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्यांना दोघींनाही जीवे मारण्याच्या उद्देशानं चक्क पेट्रोल टाकून घरच पेटवून दिलं. ही धक्कादायक घटना बुलढाण्याच्या टूनकी गावात घडली. यात घराचं मोठं नुकसान झालं असून आरोपीची सासू आणि सून दोघीही सुखरुप आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सासूच्या तक्रारीवरून जावयाला अटक केली आहे.
पतीच्या निधनानंतर सासूनं घेतला जावायाचा आधार,पण घडलं विपरितच
पतीचं निधन झाल्यावर आधार हवा म्हणून कस्तुराबाई यांनी आपल्या मुलीला आणि जावयाला आपल्या घरी आणलं. पण जावई अंबादास झालटे याला दारूचं व्यसन असल्यानं तो नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करीत असे. काल अंबादास हा दारू पिऊन आला आणि आपल्या सासूबाईंकडे तो अजून पैसे मागू लागला. पैसे दिले नाही म्हणून सासूबाईंचा मोबाईल फोडला आणि सासूसह पत्नीला मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यानं त्यानं दोघींना मारण्याच्या हेतूनं घरावर पेट्रोल टाकून घरच पेटवून दिलं. यात नशीब बलवत्तर म्हणून कस्तुराबाई आपल्या मुलीसह बाहेर पडल्या आणि वाचल्या. पण घर पूर्णपणे जळून खाक झालं. कस्तुराबाई यांनी सोनाला पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी जावई अंबादास झालटे याला अटक केली आहे.
जावई दारू पिऊन आल्यावर आपल्या पत्नीला आणि सासूला मारहाण करताच दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करत होता. सासूनं मोबाईलवरून गावातील परिचितांना माहिती देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अंबादासनं सासूबाईंचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आदळून फोडून टाकला. एवढ्यावरच तो थांबला नाही, त्यानं कुटुंबाला संपविण्याच्या उद्देशानं घरच पेटवून दिलं. समयसूचकता दाखवत घरातील सासू, मुलगी आणि नातवंड घराबाहेर पडल्यानं पुढील अनर्थ टळला. यामुळे मात्र समाजात दारूचे दुष्परिणामही समोर आलेत. कस्तुराबाई यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दिली, सोनाळा पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करून बेड्या ठोकल्या, संग्रामपूर न्यायालयान अंबादासला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आदिवासी भागात दारूचा महापूर, अशा घटना नेहमीच्याच
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दारूचा महापूर आलेला आहे. यामुळे नागरिक व्यसनाधीन झाल्यानं अशा घटना घडत असल्याचं या भागातील सुज्ञ नागरिक सांगतात आणि त्यामुळे दारू पिऊन आपलं घर जाळण्यासाठी आणि आपलं कुटुंब संपविण्यासाठीही हे मागेपुढे बघत नाहीत. अंबादास झालटे नामक जावयानं सासूचा आधार बनण्याचं सोडून दारूच्या आहारी गेल्यानं आपल्या पत्नीसह कुटुंबच उध्वस्त करण्याचा घाट घातला होता. टूनकी येथील कस्तुराबाई यांच नशीब बलवत्तर म्हणून त्या या घटनेतून बचावल्या.