न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत दहशतवादावर आपली भूमिका मांडताना भारताने पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. एकीकडे पाकिस्तान या जागतिक व्यासपीठावर शांततेसाठी प्रयत्नशील असल्याचं दाखवतोय आणि दुसरीकडे त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान हे दहशतावादी ओसामा बिन लादेनचा उल्लेख 'शहीद' असा करुन त्याचे उदात्तीकरण करतात अशी टीका भारताने केली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी ए अमरनाथ यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत पाकिस्तानवर आसूड ओढला. 


पाकिस्तान सातत्याने त्यांच्या शेजारील देशांच्या विरोधात दहशतवादांचा वापर करत आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या त्या देशाला संयुक्त राष्ट्राच्या तत्वांशी काही घेणं-देणं नाही अशी टीका भारताने केली. 


संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 76 व्या सेशनची चर्चा सुरु असताना भारताचे प्रतिनिधी ए अमरनाथ यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत पाकिस्तानच्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, "पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील कायमचे प्रतिनिधी हे शांतता आणि सुरक्षेच्या बाता मारतात. पण त्याच वेळी त्या देशाचे पंतप्रधान हे जागतिक दहशतवादी असलेल्या ओसामा बिन लादेनचा शहीद असा उल्लेख करत त्याचं उदात्तीकरण करतात." 


ए अमरनाथ पुढे म्हणाले की, "पाकिस्तानने भारतावर जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या संदर्भात टीका केली. पण हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याने या टीकेला उत्तर द्यायला भारत बांधील नाही. जम्मू आणि काश्मीरचा संपूर्ण प्रदेश हा भारताचा होता आणि भारताचाच राहणार. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश आहे."


पाकिस्तानने भारताचा अवैध्य मार्गाने बळकावलेला भाग हा तात्काळ परत करावा अशी मागणी संयुक्त राष्ट्रातील भारतीय प्रतिनिधींनी केली. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या व्यापपीठाचा वापर नेहमी भारताविरोधात केला आहे. त्याला भारताने वेळोवेळी प्रत्युत्तर दिल्याने प्रत्येकवेळी पाकिस्तान तोंडघशी पडल्याचं दिसतं. 


पाकिस्तानने भारत तसेच अफगाणिस्तानविरोधात आणि इतरही शेजारील देशांच्या विरोधात नेहमीच दहशतवाद्यांचा वापर केला आहे. अमेरिकेवरील दहशतवादी हल्लाला कारणीभूत असलेल्या ओसामा बिन लादेनचा उल्लेख पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'शहीद' असा केला होता. 


संबंधित बातम्या :