Buldhana Crime News: बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात एका 34 वर्षीय महिलेवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला होता. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आठ आरोपींविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेसोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वतः या भागाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोरखेडी पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या मांडून हा गुन्हा पुन्हा दाखल करून घेतला होता. पोलीस अधिकाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. हे वृत्त पसरताच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. पोलीस तपासात तशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता माझ्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही. फक्त आरोपींनी आमच्याकडील पैसे, मोबाईल आणि आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी दिली, आरोपी तिथून निघून गेले, असं या 34 वर्षीय महिलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. लैंगिक अत्याचार झालेलाच नाही. त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीचीही गरज नाही, असं या महिलेनं पोलिसांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना लिहून दिलं आहे.


घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तीन तास ठिय्या?


या घटनेनंतर बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तात्काळ बलात्काराचा गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी त्यांनी बोराखेडी पोलीस स्थानकात रात्री तीन ते चार तास ठिय्या मांडला होता. यावेळी पोलिसांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना संजय गायकवाड यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं.


पीडित महिला काय म्हणाली?


गुन्हा दाखल झाल्यानंतर आज दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, न्याय वैद्यक पथकानं आणि श्वान पथकानं घटनास्थळी तपास केला. त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या घरी जाऊन महिलेचा जबाब नोंदवून घेतला. या जबाबात महिलेनं म्हटलं आहे की, "काल दुपारी दोन वाजता आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून टेकडीवर आम्ही बसलो. त्यावेळी तिथे आठ जण आले. त्यांनी आम्हाला घेरलं. सोबतच्या पुरुषालाही मारहाण केली. त्या आठ जणांचे चेहरे रुमालानं बांधलेले होते. आमच्याकडून त्यांनी पैसे आणि मोबाईल घेऊन ते तिथून निघून गेले, त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपींनी कोणताही लैंगिक अत्याचार केलेला नाही. त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीची गरज नाही, असंही महिलेनं वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. सदर जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे.


सत्य समोर कसं येणार?


राजूर घाटात झालेल्या या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळणं लागलं आहे. महिलेसोबतच्या पुरुष नातेवाईकानं तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र महिला सांगते माझ्यावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही. असे दोन वेगवेगळे जबाब समोर आल्यानंतर संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र पोलिसांनी अजूनही तपास थांबवलेला नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळणार? की सत्य बाहेर कसं येणार? आणि कधी येणार? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी होणार का? जर बलात्कार झालाच नाही तर सोबतच्या पुरुषानं बलात्काराची तक्रार का दिली? आमदारांनी त्या ठिकाणी गोंधळ घालून पोलिसांवर दबाव आणून पुन्हा दाखल करायला का लावला? का त्या महिलेवर किंवा पुरुषावर राजकीय फायद्यासाठी काही लोकांनी दबाव आणला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात समोर येतील अशी अपेक्षा आहे.