IND vs WI, 1st Test : यशस्वी जयस्वालची पदार्पणात शतकी खेळी आणि आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात १२ विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजा पहिल्या डावात १५० आणि दुसऱ्या डावात १३० धावांत रोखले. यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात १७१ धावांची दमदार खेळी केली. रोहित शर्मानेही शतकी खेळी केली.
भारताने २७१ धावांची आघाडी झाल्यानंतर डाव घोषित केला. भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना फक्त १३० धावा करता आल्या. अश्विनने सात विकेट घेतल्या. तर जाडेजाला दोन विकेट मिळाल्या. सिराजने एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला तीस धावसंख्या ओलांडता आली नाही. अनाथाझे याने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजने १०० धावांच्या आत सात विकेट गमावल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. जेसन होल्डर २० धावांवर नाबाद राहिला.
421 धावांवर भारताचा डाव घोषित -
भारताचा कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या दिवशी 421 धावांवर डाव घोषित केला. वेस्ट इंडिजला 150 धावांवर रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात पाच विकेटच्या मोबदल्यात 421 धावा केल्या. पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (171) आणि रोहित शर्मा (103) यांनी शतकी खेळी केली. तर विराट कोहलीने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडे 271 धावांची आघाडी होती.
यशस्वी जयस्वाल याने पदार्पणातच 171 धावांची खेळी केली. या खेळीत यशस्वीने 16 चौकार आणि एक षटकार लगावला. तर रोहित शर्माने 103 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने दोन चौकार आणि दहा षटकार लगावले. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. पण शुभमनला मोठी खेळी करता आली नाही. शुभमन अवघ्या सहा धावा काढून तंबूत परतला. गिल तंबूत परतल्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारताचा डाव सावरला. रोहित शर्मा आणि गिल यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी 110 धावांची भागिदारी केली. अल्जारी जोसेफ याने यशस्वी जयस्वाल याला 171 धावांवर बाद करत वेस्ट इंडिजला आजच्या दिवसातील पहिले यश मिळवून दिले. यशस्वी बाद झाल्यानंतर भारताची सर्वात अनुभवी जोडी मैदानात होती. पण अजिंक्य रहाणेला संधीचे सोनं करता आले नाही. अजिंक्य रहाणे तीन धावांवर केमर रोचचा शिकार झाला. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी डावाची सुत्रे हातात घेतली. विराट कोहली याने अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात विराट कोहली तंबूत परतला. विराट कोहलीने पाच चौकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. इशान किशन आणि रविंद्र जाडेजा काही काळ मैदानात स्थिरावले. पण रोहित शर्माने भारताचा डाव घोषित केला. इशान किशन पदार्पणाच्या सामन्यात एका धावेवर नाबाद राहिला. रविंद्र जाडेजा 37 धावांवर नाबाद होता.
अश्विनचा पंच, वेस्ट इंडिजचा डाव १५० धावांत संपला
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी निराश केला. पहिल्याच दिवसात वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव आटोपला होता. अश्विनच्या पाच विकेटच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला १५० धावांत बाद केले. टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि जाडेजा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अगदी तुटून पडले. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 47 धावा एलिकनं केल्या. त्यानं 99 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एक षटकार लगावला. इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट अवघ्या 20 धावा करुन माघारी परतला. तेजनारायण चंद्रपॉल 12 धावांवर आऊट झाला, तर कॉर्नवाल 19 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियासाठी अश्विननं 24.3 ओव्हर्समध्ये 60 धावा देत तब्बल 5 विकेट्स घेतले. त्यानं 6 मेडन ओव्हरही काढले. अश्विनसाठी हा डाव अत्यंत खास होता. त्याचं कारण म्हणजे, टीम इंडियाच्या स्टार स्पिनरनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवलं, त्यासोबतच त्यानं 700 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केले. रवींद्र जाडेजानं 14 ओव्हर्समध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानं 7 मेडन ओव्हर्स काढले. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजनंही प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.