Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी केलेल्या एका छुप्या कारवाईला मोठे यश आले आहे. या कारवाईत बुलढाणा पोलिसांनी (Buldhana Police) चौघांना 4 देशी पिस्टल आणि सतरा जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई असल्याचे मानल्या जात आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी (Buldhana Crime News) सापळा रचून ही कारवाई केली आहे. यात त्यांच्या जवळून 4 पिस्टल, मॅगझीनसह 17 जिवंत काडतुसे, दुचाकी वाहन, मोबाईल असा 2 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या चौघांची कसून चौकशी करण्यात आली असता ते मध्यप्रदेशचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून यामध्ये आणखी काही व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. 


अवैध शस्त्रांची तस्करी करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद


बुलढाणा जिल्ह्याच्या सोनाळा पोलिसांनी वसाडी ते हाडियामल या गावादरम्यान ही कारवाई केली. सापळा रचून केलेल्या या कारवाईत पिस्टलचा सौदा करण्याच्या बेतात असलेल्या चौघांची झडती घेण्यात आली असता, त्यांच्या जवळून 4 पिस्टल, मॅगझीनसह 17 जिवंत काडतुसे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भारसिंग मिसऱ्या खिराडेव, हिरचंद गुमानदेव उचवार (दोन्ही रा. पाचोरी, तहसिल खकणार, जिल्हा बऱ्हाणपूर), आकाश मुरलीधर मेश्राम,( रा. करूनासागर, बालाघाट) संदीप डोंगरे (रा. आमगाव, बालाघाट) अशी चौघा संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.


लग्नात आलेल्या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू


गोंदियाच्या देवरी तालुक्यातील गोटानपार येथे लग्न कार्यक्रमात गेलेल्या एका 12 वर्षीय चिमुकल्या मुलीचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज, शनिवारी दुपारच्या समोर घडली. या घटनेमुळे देवरी तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांना या घटनेचे माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत  घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. 


मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, 12 वर्षीय चिमुकली आपल्या बहिणीसोबत गोठनापार येथील लग्न समारंभात गेली होती. दरम्यान, लग्न समारंभ आटोपल्यावर ती अचानक दिसेनासी झाली. परिणामी,परिसरात एकच खळबळ उडाली आणि त्या मुलीची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. मुलीची शोध मोहीम सुरू असताना तिचा मृतदेह जवळच्या जंगल परिसरात आढळला. घटनेची माहिती कळताच त्या बद्दलची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिस्थितीवरून मुलीवर अत्याचार झाल्याच्या संशय व्यक्त केलाय.सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास त्या दिशेनेही करत असल्याची माहिती पुढे आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या