Buldhana Crime News : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर नवनवीन शक्कल लढवून अवैधरित्या शस्त्रांची वाहतूक केली जाते. या शस्त्र माफियांच्या अवैध धंद्यावर पोलिसांनी (Buldhana Police) करडी नजर ठेवली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत अवैधरित्या होणाऱ्या शस्त्रांच्या (Buldhana Crime News) कारवाईचा मनसुबा हाणून पाडला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील संग्रामपूर तालुक्यातील तुंगी गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. यात एका इसमास सहा देशी पिस्टल आणि मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे सीमेलगत गावातून अवैधरित्या शस्त्रांची वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे.


 6 देशी पिस्टल सह एकास अटक


बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यालगत मध्य प्रदेशची सीमा आहे. सीमालगत असलेले हे गाव अवैधरित्या शस्त्रांच्या तस्करीसाठी कायम चर्चेत राहिले आहे. या परिसरात अनेकदा देशी पिस्तूल खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. गेल्यावर्षी झारखंड पोलिसांनी सुद्धा या ठिकाणाहून सहा जणांना अटक केली होती. अशीच एक अवैधरित्या शस्त्रांच्या तस्करीची छुपी कारवाई होत असल्याची गोपनीय माहिती बुलढाणा पोलिसांना प्राप्त झाली. या गुप्त माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांनी सापळा रचत एका इसमास सहा देशी पिस्टलसह अटक केली आहे. या कारवाईमुळे  पुन्हा एकदा या परिसरात शस्त्र तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी तस्करी करणाऱ्या इसमाल अटक केली असून या कारवाई मागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध सध्या पोलीस घेत आहे. 


अवैध शस्त्रांचा सर्रास वापर


राज्यात दिवसागणिक होणारे अपराध आणि गोळीबाराच्या घटना बघता गुन्हेगारी विश्वात अवैध शस्त्रांचा वापर वाढला आहे. राज्यात एकापाठोपाठ एक गोळीबारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. बहुतांश प्रकरणात अवैध शस्त्रांचा पुरवठा हा लगतच्या राज्यातून होत असल्याचे तपासातून उघड झाले आहे. अगदी माफक दरात देशी पिस्टल अथवा इतर शस्त्र उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तिकडे बिनापरवाना शस्त्र असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यांच्या सीमेवरून होणाऱ्या या अवैध तस्करीविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मात्र या प्रकरणातील मोठे मासे शोधून काढणे हे पोलिसांपुढचे  मोठे आव्हान ठरणार आहे.     


इतर महत्वाच्या बातम्या