गया : बँकेत ठेवलेला पैसा सर्वात सुरक्षित असं आपण म्हणतो. त्यामुळेच, घरात पैसे ठेवण्याऐवजी आपण बँकेत (bank) पैसे जमा करतो. बँकेतून आपल्याला हवे तसे ते पैसे काढतो. याशिवाय बँकेतील लॉकरमध्ये सोनं-चांदी व मौल्यवान वस्तूंदेखील ग्राहकांकडून ठेवण्यात येतात. मात्र, बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित म्हणून ठेवलेले सोनंच (Gold) गायब झाल्यावर काय होईल. होय, असाच धक्कादायक प्रकार बिहार राज्यातील गया शहरातून उघडकीस आला आहे. येथील कॅनरा बँकेत एका महिलेने ठेवलेले 25 तोळे सोनं गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील बाली गावात राहणाऱ्या वंदना कुमारी यांनी सिव्हील लाईन पोलीस (Police) ठाण्यात धाव घेत आपली आप बिती सांगितली. कॅनर बँकेतील लॉकर सुविधा आपण 2018 मध्ये घेतली होती. त्यानंतर, येथील लॉकरमध्ये आपल्याकडी 25 तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते.
लॉकरमधील सोनं काढण्यासाठी त्या गेल्या असता, लॉकर रिकामाच दिसल्याने त्यांना धक्काच बसला आहे. बँकेतील नोंदणी दफ्तरात खाडाखोड करण्यात आली आहे. येथील बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागातूनच माझ्या बँक लॉकरमधील सोनं गायब झाल्याचं वंदना कुमारी यांनी म्हटलं आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. वंदना कुमारी यांनी पोलिसांकडे आपली कैफियत मांडली असून, बँकेतील लॉकरमध्ये 250 ग्रॅम म्हणजे 25 तोळे सोनं ठेवण्यात आलं होतं. त्यामध्ये, दागिने व सोन्याची अंगठदेखील होती. यापूर्वी 2022 मध्ये आपण हे लॉकर चेक केले होते. त्यावेळी, लॉकरमधील सोनं व दागिने सर्वकाही व्यवस्थित होतं. मात्र, 19 सप्टेंबर रोजी मी बँकेत आले, बँकेतील लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला असता लॉकर उघडलं गेलं नाही. त्यामुळे, मी 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा बँकेत येऊन लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हाही हे लॉकर उघडलं गेलं नाही. त्यामुळे, बँक कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरुन मी घरी परतले. त्यानंतर, 25 सप्टेंबर रोजी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर लॉकर तोडण्यात आले. त्यावेळी, लॉकरमधील सोनं गायब झाल्याचं दिसून आलं.
घडलेल्या घटनेनंतर बँक मॅनेजरने बँक लॉकर रजिस्टर मागवले, त्यामध्ये माझं लॉकर अकाऊंट चेक केलं. त्यावेळी, माझ्या लॉकरचा नंबर आणि चावी यांमध्ये छेडछाड करण्यात आल्याचं दिसून आलं. दरम्यान, याप्रकरणी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर, बँक अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
हेही वाचा
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी