भिवंडी :  मुस्लिम दिनदर्शिकेनुसार रमजान-उल मुबारकचा महिना. रमजानच्या महिन्यात खजुरापासून तर शीरखुर्मा असा लज्जतदार पदार्थांचा आनंद लुटण्याचा हा सण आहे. मात्र शीरखुर्माची लज्जत वाढवणाऱ्या  शेवयांचा काळाबाजार होत असल्याने त्याचे दर  दुपट्टीने वाढले आहेत. त्यामुळे एका व्यापाऱ्याने काळाबाजार रोखण्यासाठी बनारसहून दोन ट्रक भरून शेवयांचे बॉक्स स्वस्त दरात विक्रीसाठी आणले होते. मात्र शेवयांचा काळाबाजार करणाऱ्या माफियांना याची खबर मिळतच त्यांनी दोन्ही ट्रकचा पाठलाग करत ट्रक चालकांना नाशिक मुंबई महामार्गावरील पडघा टोलनाका येथे बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. शिवाय ट्रक सर्व्हिस सेंटरवर नेऊन दोन्ही ट्रकमधील   शेवयांवर पाणी ओतल्याने व्यापाऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार  गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


भिवंडी शहरात मुस्लिम बांधव लाखोंच्या संख्येने राहतात. या शहरात रमजान महिन्यात खानपानासह विविध खाद्यपदार्थ विक्रीतून  कोट्यावधीची उलाढाल होत आहे. याचाच फायदा घेऊन भिवंडीतील काही शेवयांची घाऊक विक्री करणाऱ्या माफियांनी अचानक गेल्या 20 दिवसापासून 100 ते 125 रुपये किलो दराने मिळणाऱ्या शेवयांचे दर दुप्पट करून त्याचा काळाबाजार करत आहेत. याच काळाबाजाराची चर्चा भिवंडी शहारत होत असल्याचे पाहून शेवय्याच्या एका व्यापाऱ्याने उत्तरप्रदेश मधील बनारस शहरातून दोन ट्रक कच्च्या शेवय्या भिवंडी शहरात 100 रुपये किलो  दराचे विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन ट्रक भरून शेवयांचे बॉक्स घेऊन निघाले. मात्र दोन्ही ट्रक मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाका येथे आल्याची खबर काळाबाजार करणाऱ्या  माफियांना लागली होती. त्यानंतर दोन कारमधून आलेल्या चार अज्ञातांनी  दुपारच्या सुमारास ट्रकचा पाठलाग करत दोन्ही ट्रक महामार्गावरील शिवसागर हॉटेलजवळ अडवले. ट्रक थांबताच अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय ट्रकच्या चाव्या आणि दोन्ही चालकांचे मोबाईल फोन हिसकावून घेत त्यांना बेदम मारहाण केली.  आरोपी एवढ्यावरचं थांबले नाही तर त्यांनी दोन्ही ट्रक जवळच्या सर्व्हिस सेंटरवर नेऊन  ट्रकमधील शेवयांच्या बॉक्सवर पाण्याचे फवारे मारून संपूर्ण शेवय्या भिजवल्या.  त्यामुळे शेवय्या आणणाऱ्या व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 


चार अज्ञांताविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल


दरम्यान, शेवया भिजवल्यानंतर दोन्ही ट्रक चालकांना पुन्हा ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली. पुन्हा भिवंडी शहरात दिसला तर याद राखा, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.  त्यानंतर दोन्ही ट्रक पुन्हा आल्या मार्गाने जात असताना माफियांनी पाठलाग केला. मात्र  कसारा चेकपोस्टवर दोन्ही ट्रक पथकाने तपासणीसाठी अडवले असत  त्या ठिकाणावरून आरोपींनी कारमधून पळ काढला. तर दुसरीकडे ट्रक अद्यापही भिवंडी शहरात आले नसल्याचे पाहून ट्रकवरील जीपीएस लोकेशनवरून ट्रक मालक आणि शेवयांचे व्यापारी घटनास्थळी आले. त्यानंतर  ट्रक चालक नितेशकुमार रामकेशव यादव (28) यांच्या तक्रारीवरून पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात चार अज्ञांताविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी मुंबई नाशिक महामार्गवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे.


काळाबाजार करणाऱ्यांची खुलेआम दादागिरी


दरम्यान भिवंडीत जर शेवयांचा व्यापार करायचा असेल तर काळाबाजार करणाऱ्यांनी सांगितले त्याप्रमाणे शेवया खरेदी करून  बाजारात विक्री करावे अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना देण्यात आल्याचे दुकानदारांने सांगितले. दादागिरीच्या जोरावर अनेक दुकानदाराने शेवया खरेदी करत  बाजारात वाढीव भावाने विक्रीही सुरू केली आहे. मात्र ज्यांनी ऐकलं नाही त्यांना धमक्या दिली जात आहेत. काळाबाजार करणाऱ्यांची खुलेआम दादागिरी  सुरू असून बिनधास्तपणे ग्राहकांची लूट होत असून देखील प्रशासन यांच्यावर कारवाई का करत नाही याचे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.


नागरिकांच्या खिशाला  भुर्दंड


तर दुसरीकडे ऐन रमजान महिन्यात खाद्यपदार्थांच्या अचानक वाढणाऱ्या किमतीमुळे नागरिक हैराण झाले असून शेवया माफियांच्या काळ्या बाजारमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड पडत आहे. 100 रुपये प्रति किलो मिळणाऱ्या शेवया 200 ते 350 रुपयापर्यंत मिळत असल्याने नागरिकांमध्ये आक्रोश देखील दिसत आहे. यंदा रमजान महिन्यात शेवयांमध्ये देखील काळाबाजार होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. तसेच शेवया खुल्या विकत असल्याने त्याच्या गुणवत्तेबाबत देखील कोणती माहिती नसेत. शेवयांच्या दरांबरोबर गुणवत्तेची तपासणी करणे ही अन्न औषध व प्रशासन विभागाची ही जबाबदारी आहे. मात्र त्यांच्याकडून तपासणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान सण साजरा करण्याकरता नागरिक किलोऐवजी अर्धा किलो शेवया खरेदी करत असून काळाबाजार करणाऱ्या माफियांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांच्यावतीने जोर धरत आहे .