Bhiwandi Crime : मैत्रिमध्ये मस्करी आली, भांडणं आली. पण अशाच मस्करीवरुन भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. मस्करीत मित्राला 'ये लंबू' असं म्हणणं एका मित्राच्या जीवावर बेतलं आहे. धक्कादायक बाबा म्हणजे, मित्रानं मस्करीत लंबू असं संबोधताच आरोपी मित्रानं चाकूनं भोकसून भररस्त्यात मित्राची हत्या केली. ही घटना भिवंडीतील नुरीनगर परिसरात घडली आहे. 


याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करित पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. समीर शेख (वय, 21) या मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांचा एक साथीदार फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर मोहम्मद अजगर शेख उर्फ सन्नाटा (वय 20) असं हत्या झालेल्या मित्राचं नाव आहे. 


मृत मोहम्मद अजगर हा कुटूंबासह भिवंडीतील नुरी नगर परिसरात राहतो. काही दिवसापूर्वी मृत्यू झालेला मित्र आणि आरोपी समीर शेख यांच्यात काही कारणावरून वाद होऊन भांडण झालं होतं. त्यातच काल रात्रीच्या सुमारास मृत मोहम्मद अजगर यानं आरोपी समीरला 'ये लंबू' म्हणून जोराने आवाज दिला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन झटापटी झाली. त्यावेळी आरोपीसह त्याच्या साथीदारांनी भर रस्त्यातच मृत मोहम्मद अजगरला मारहाण केली. एवढंच नाहीतर त्यानंतर सीमरनं मोहम्मदवर धारदार चाकूनं वारही केले. ही घटना पाहून परिसरातील जमावाने आरोपी समीरला पकडून जबर मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत आरोपी  समीरही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य पाहता परिससरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी नितीन पाटील करीत आहेत.


दरम्यान, फक्त मस्करीमुळे दोन मित्रांमध्ये हाणामारी झाली आणि त्याचं रुपांतर वादात झालं. एवढंच नाहीतर शुल्लक कारणावरुन एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच भितीचं वातावरणंही निर्माण झालं आहे. आरोपींपैकी एक आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :