मुंबई : मुंबई कल्याण कुराड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अशी फिल्मी घटना घडली आहे जी घटना तुम्ही ऐकलीत, वाचलीत तर तुमच्या पायाखालून वाळू सरकेलच पण तुमची तळपायाची आग देखील मस्तकात जाईल. माहेरी गेलेल्या आपल्या पत्नीला परत बोलावण्यासाठी अजय गौड नावाच्या व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांच्या मृत्यूचा बनाव रचला. या कृत्यामुळे त्याच्या मुलीचा जीव गेला असता.


कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनिवारी सकाळी अजय गौडने आपल्या सख्ख्या मुलाला तिरडीवर झोपवलं आणि त्यावर पांढरी चादर टाकली, हार-फुलं टाकली. त्या तिरडीच्या बाजूला अगरबत्ती लावून असा बनाव केला की त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. तर दुसरीकडे घरातल्या पंख्याला आपल्या मुलीला लटकवून तिचे फोटो काढून आपल्या मुलीने आत्महत्या केलेली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला.  त्याच्या या कृत्यामुळे त्या मुलीचा जीव गेला असता. 


बायकोला भावनिकरित्या घरी बोलवण्याच्या नादात अजय गौड हा मुलीला फाशी घ्यायला सांगत होता. पण आपल्याला मरायचं नाही, आपल्याला जगायचं आहे असं सांगून अजय गौडची मुलगी मोठमोठ्याने रडत होती. त्या मुलीचा आवाज अजय गौडच्या शेजारच्यांना गेल्यावर त्यांनी धाव घेऊन त्या मुलीची सुटका केली. यामुळे त्या मुलीचा जीव वाचला. घडलेला प्रकार लोकांनी पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अजय गौडला अटक केली.


अजय गौड हा सतत नशेत असतो. नशा करून पत्नी आणि मुलांना बेदम मारहाण करत असतो. याच जाचाला कंटाळून अजय गौडच्या पत्नीने काही महिन्यांपूर्वी घर सोडून ती आपल्या माहेरी निघून गेली. पत्नी परत यावी याकरता अजय गौडने आपल्या दोन्ही मुलांच्या मृत्यूचा कट रचला होता. सुरुवातीला फक्त फोटो काढून पत्नीला पाठवायचे आहेत असं सांगणाऱ्या आरोपी अजय गौडने आपल्या मुलीला फाशी घ्यायला सांगितली. त्याच वेळेस हा सगळा प्रकार समोर आला. 


अजय गौड दारूच्या नशेत अनेकदा आपल्या पत्नीला खूप मारहाण करत असेल आणि याच कारणामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. अजय गौडचा अत्याचार इतक्या शिगेला पोहोचला होता की त्याच्या मारहाणीमुळे त्याच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली होती. घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असून कुरार पोलिसांनी अजय गौड याला अटक केली आहे.


संबंधित बातम्या :