भिवंडी :  पान टपरीच्या गल्ल्यातून आपला कामगार पैसे लंपास करीत असल्याच्या संशयातून टपरीच्या मालकाने एका साथीदारासह  कामगाराची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही खळबळजनक घटना भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील कुकसे गावाच्या हद्दीत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करून कामगाराचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने चिंचवली गावाच्या हद्दीतील झाडीझुडपात फेकून दिला होता. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मालकासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. मोहम्मद उमर जलीलउद्दिन शेख, (रा. मिल्लतनगर भिवंडी) आणि त्याचा साथीदार मोहंम्मद मोमीन शेख असे अटक आरोपीचे नावे आहेत. तर मोहम्मद मोकीन नूर (वय २८) असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील आहे. 


पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मालक मोहम्मद उमर हा भिवंडी तालुक्यातील कुकसे गावाच्या हद्दीतील पाकिजा हॉटेलमध्ये सुपरवायजर म्हणून कार्यरत होता. तर त्याचे याच हॉटेल समोरच पान टपरी आहे. याच पान टपरीवर मृतक मोकीन नूर हा  कामगार म्हणून कामाला होता. त्यातच गेल्या काही दिवसापासून आरोपी मालकाला संशय होता की, आपला कामगार पान टपरीच्या गल्ल्यातून पैसे चोरी करत असल्याचा संशय होता. यामुळेच (आज) 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गल्ल्यातील पैशांवरून वाद झाला असता, मालकाने मृतकच्या मोबाईल कव्हर चेक केले त्यावेळी त्यामध्ये  दीड हजार रुपये  आढळून आले. हे पाहून मालकाला राग येताच त्याने साथीदाराला बोलवून 11 सप्टेंबर (आज ) पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास कामगार मोकीन नूरची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह जवळ असलेल्या चिंचवली गावाच्या हद्दीतील झाडाझुडपात फेकून दिला. 


दरम्यान या घटनेची माहिती पाकिजा हॉटेल मॅनेजर विनय निरंजन ( 43)  यांना मिळताच त्यांनी पडघा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत कामगाराचा मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर आज 11 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास पडघा पोलीस ठाण्यात हॉटेल मॅनेजर निरंजन यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून काही तासातच दोन्ही आरोपीना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कदम करीत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या: