नांदेड : सामोपचाराने मिटणारी प्रकरणे दोन्ही पक्षाकडून पुढाकार घेतल्यास लोक अदालतीच्या माध्यमातून तात्काळ निकाली निघतात. यात दोन्ही पक्षांना न्यायाच्या समाधानासह वर्षोनिवर्षे न्यायालयासाठी होणाऱ्या वेळेची व पैशाची बचत करता येऊ शकते. दरम्यान नांदेडमध्ये देखील नुकत्याच झालेल्या लोक अदालतीत तब्बल 7 हजार 174 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. यातील आर्थिक व्यवहाराशी निगडीत असलेल्या प्रकरणात 35 कोटी 10 लाख 42 हजार 22 रुपये एवढ्या रक्कमेची तडजोड झाली आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त सुमितला लोक अदालतीत न्याय देण्यासाठी जिल्हा न्यायाधीश न्हावकर स्वतः न्यायालयीन आवारात पोहचल्याचे पाहायला मिळाले. 


सुमित शिवाजी पवार यांचा 9 डिसेंबर 2020 रोजी अपघात झाला होता. त्यांनी मोटर अपघात दावा दाखल केला होता. त्यांचा एकुण दावा 50 लाख रुपयांचा होता. तथापि यात दोन्ही पक्षांनी आपआपसात तडजोड करून या लोक अदालतीचा मार्ग स्विकारावा असे त्यांना सुचविले होते.  जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर मराठे पॅनल अध्यक्ष यांनी व्हिलचेअरवर असलेल्या सुमितला न्यायालयीन आवारात जाऊन सामोपचाराने तडजोड घडवून आणली. सुमित पवार यांच्या अपघात भरपाईपोटी 25 लाख 50 हजार रुपये या किंमतीवर तडजोड घडवून आणली. या लोक अदालतीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एकुण प्रलंबित 55 दिवाणी प्रकरणात सामोपचाराने तडजोड करण्यात आली. या प्रकरणाचे मुल्य 18 कोटी 49 लाख 14 हजार 486 रुपये इतके होते.


पती-पत्नीच्या कौटुंबिक वादाची 52 प्रकरणे तडजोडीने मिटली


काही कुटुंबात, पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला जातात. ही प्रकरणे न्यायालयात जातात. यात विनाकारण दोन्ही कुटुंब होरपळून निघतात. कौटुंबिक न्यायालयात अशा प्रकारची सुरू असलेली प्रकरणे दोन्ही पक्षांच्या सामोपचाराने निकाली निघावित यासाठी लोकअदालतीमध्ये भर देण्यात आला. यात पती-पत्नीचे व कौटुंबिक वादाची एकूण 52 प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. 5 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरुवात करुन लोकअदालतीचा लाभ संपादन केला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी दाम्पत्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


विशेष मोहीमेअंतर्गत 1 हजार 197 प्रकरणे निकाली


न्यायालयीन प्रकरणात सामोपचाराने आपआपसातील वाद, तंटे मिटावेत या उद्देशाने जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे तडजोड झालेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार व सहकार न्यायालयाच्या प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा यात समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेअंतर्गत 1 हजार 197 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sanjay Biyani: संजय बियानी यांच्यावर गोळ्या झाडणारा दीपक रांगा नांदेड पोलिसांच्या ताब्यात, 21 सप्टेंबरपर्यंत कोठडी