नवी दिल्ली : आतापर्यंत झारखंडचे जामतारा आणि हरियाणाचे नूह हे सायबर गुन्ह्यांचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. आता सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत राजस्थानच्या भरतपूर आणि उत्तर प्रदेशातील मथुरा हे जिल्हेदेखील केंद्रस्थानी आले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरमध्ये सुरू झालेल्या एका स्टार्टअपने आपल्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधनानुसार, देशभरातील 80 टक्के सायबर गुन्हे हे टॉप 10 जिल्ह्यांमधून घडतात.
टॉप 10 सायबर गुन्हे जिल्हे
आयआयटी कानपूरमधील फ्युचर क्राइम रिसर्च फाउंडेशन (FCRF) या ना-नफा स्टार्टअपने दावा केला आहे. या स्टार्टअपने आपल्या ‘अ डीप डायव्ह इन सायबर क्राइम ट्रेंड्स इम्पॅक्टिंग इंडिया’ या संशोधनात हा दावा केला आहे.
FCRF नुसार, भरतपूर (18 टक्के), मथुरा (12 टक्के), नूह (11 टक्के), देवघर (10 टक्के), जामतारा (9.6 टक्के), गुरुग्राम (8.1 टक्के), अलवर (5.1 टक्के), बोकारो (2.4 टक्के), कर्मा टंड (2.4 टक्के) आणि गिरीडीह (2.3 टक्के) हे जिल्हे भारतातील सायबर गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आहेत. या 10 जिल्ह्यातून एकत्रितपणे 80 टक्के सायबर गुन्हे घडतात.
नूंह पोलिसांनी केला होता गौप्यस्फोट
FCRF चे सह-संस्थापक हर्षवर्धन सिंग म्हणाले, “आमचे विश्लेषण भारतातील 10 जिल्ह्यांवर केंद्रित होते जिथे सर्वाधिक सायबर गुन्हे घडतात. "संशोधन पेपरमध्ये, या जिल्ह्यांतील सायबर गुन्ह्यांचे प्रमुख कारण समजून घेणे प्रभावी प्रतिबंध आणि निर्मूलन धोरणे तयार करण्यासाठी आवश्यक आहे."
देशातील वाढती सायबर गुन्हेगारी ही चिंतेची बाब आहे. असे फसवणूक करणारे नवनवीन डावपेच अवलंबतात आणि लोकांना आपला बळी बनवतात. नुकतेच सायबर गुन्ह्याबाबत नूह पोलिसांनीही धक्कादायक माहिती उघड केली होती. सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या बहुतांश हॅकर्सनी बारावीपर्यंतच शिक्षण घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते, तर काही हॅकर्स निरक्षरही होते.
आठ महिन्यात पुणेकरांनी गमावले 20 कोटीपेक्षा जास्त रुपये
पुणे (Pune News) शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. आठ महिन्यात पुणेकरांनी 20 कोटी पेक्षा जास्त रुपये गमावले आहे. पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे आत्तापर्यंत जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट या आठ महिन्यात 1114 विविध गुन्ह्यांचे अर्ज हे आले असून यात फक्त ऑनलाईन टास्क या गुन्ह्यात 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या अनेक महिन्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र तपास अजूनही अधांतरीच दिसत आहे. केवळ तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ॲानलाईन फसवणुकीचे अर्थात फिशींग अनेक नवीन प्रकार या सायबर चोरांनी आजमावले आहेत आणि याला सामान्य नागरीक बळी पडत आहेत.