भंडारा : वीज प्रवाहित तारांमध्ये अडकून वाघाचा मृत्यू झाला. त्यामुळं वाघ मोठा असल्यानं कारवाईच्या भीतीपोटी शेतकऱ्यानं त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं धारदार शस्त्रानं वाघाचं शीर धडावेगळं करीत अक्षरशः चार वेगवेगळे तुकडे केलेत. कालांतराने प्रकरण अंगलट येवू नये म्हणून ते गावालगत असलेल्या तीन तलाव परिसरातील झांजरीया जंगलातील बीटात फेकून दिल्याची घटना काल (6 जानेवारी) उघडकीस आली होती.
ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत पाचोरा गावालगत असलेल्या झांजरिया बीटात उघडकीस आली. याप्रकरणी वनविभागानं मध्यरात्री तीन संशयतांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये राजू वरखडे (50), दुर्गेश लसुंते (50) आणि राजेंद्र उर्फ बस्तिराम कुंजाम (55) यांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या वीज प्रवाहातील तारांमध्ये अडकल्यानं वाघाचा मृत्यू झाला. मात्र, प्रकरण अंगलट येऊन कारवाई होईल, या भीतीनं मृत वाघाचं धारदार शस्त्रानं अक्षरशः कापून चार तुकडे केलेत. त्यानंतर चारही तुकडे गावालगतच्या तीन तलाव परिसरातील झांजरिया बिटातील कक्ष क्रमांक 74 बी आर एफ मध्ये फेकलेत. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात 6 जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली आणि वन विभागात एकचं खळबळ उडाली. घटनेचं गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह वन कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यावेळी घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागानं आरोपीचा माग काढण्यासाठी डॉग स्कॉड ला पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ बारापात्रे यांनी मृत वाघाचं शवविच्छेदन करून विसेरा उत्तरिय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यानंतर मृत वाघाचं शव घटनास्थळी दहन करण्यात आलं.
चंद्रपूर शहरालगतही वाघाचे दर्शन
यवतमाळच्या जंगलातील वाघ धाराशिवच्या पायथ्याला दिसून आल्याने वन विभागाचे लक्ष तिकडे लागले आहे. तर, चंद्रपूर शहरालगतच्या नांदगाव खुल्या कोळसा खाणीतही वाघाचा वावर असल्याचे बोलले जात होते. दरम्यान या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भला मोठा वाघ कैद झाला आहे. बूम बॅरिअरजवळ तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला हा वाघ दिसला होता. नांदगाव खाणीच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही हा वाघ झाला कैद असून कोळसा खाण क्षेत्रात वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचा निर्णय घेतलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या