भंडारा :  तीन सामने हरल्यानंतर चौथा सामना खेळण्याचा आग्रह एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. क्रिकेट सामन्याच्या वादातून दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा जीव गेला. भंडाऱ्यामध्ये (Bhandara News) ही धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्तीनाथ कावळे असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला (Police Arrested Accused) अटक केली आहे. 


रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मित्रमंडळी गावालगत असलेल्या मैदानात क्रिकेट खेळत होते. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि तो विकोपाला गेल्याने एकाने मित्राची बॅटने निर्घृण हत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली येथे घडली. निवृत्तीनाथ गोपीचंद कावळे (24) रा. चिखली असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी करण रामकृष्ण बिलवणे (21 वर्ष) याला अटक केली आहे.


सामना खेळण्याचा आग्रह जीवावर बेतला 


पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली या गावात या घटनेनंतर तणावपूर्व शांतता निर्माण झाली आहे. सध्या गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवार असल्याने हे सर्व मित्रमंडळी गावालगत असलेल्या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. तीन वेळेस क्रिकेटची मॅच लावण्यात आली. त्यात मृतकाच्या संघाने तिन्ही मॅचेस हरल्यात. परंतु, पुन्हा एकदा चौथी मॅच खेळावी असा आग्रह मृतक निवृत्तीनाथ कावळे याने आरोपी करण बिलवणे याला केली. मात्र, करण याने निवृत्तीनाथ याला यापूर्वी तिन्ही मॅच हरल्याने आता खेळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर घराकडे निघत असताना दोघांमध्ये वाद झाला. यात आरोपी करण याने त्याच्याकडे असलेल्या बॅटने निवृत्तीनाथ याला बेदम मारहाण केली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 


या घटनेनंतर गावात तणावपूर्व शांतता आहे. गावातील परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत निवृत्तीनाथ हा अत्यंत गरीब घरचा आहे. त्यामुळे कुटुंबाला हातभार लावता यावा यासाठी शिक्षणासोबतच त्याने मोलमजुरीचे कामे केले होते. सध्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होता. त्याच्या या हत्येवर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 



रेल्वे रुळावरून जाणाऱ्या प्रवाशी महिलेवर कैचीने वार, दागिने आणि मोबाईल पळविणारा चोर गजाआड


 रेल्वे प्रवास करून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका महिलेचा चोरट्याने पाठलाग करत अचानक तिच्यावर कैचीने वार करून गळ्यातील मंगळसूत्र , कानातील बाली आणि  मोबाईल असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्या चोरट्या विरोधात विविध कालमानुसार गुन्हा दाखल केली होती. त्यानंतर  दागिने घेऊन धूम ठोकणाऱ्या चोरट्याला गस्तीवरील रेल्वे पोलिसांनी  (Dombivli Crime) काही वेळातच गजाआड केले आहे. लालबहादूर बाकेलाल यादव (वय 24, रा. पीएनटी कॉलनी , डोंबिवली पूर्व ) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.