Bhandara Crime News : "माय मरो पण मावशी जगो "अशी मावशीची महती सांगणारी म्हण आपण नेहमी एकत असतो. परंतु,  भंडाऱ्यातील एका मावशीने चहामध्ये गुंगीचे औषध टाकून बहिणीच्या मुलीला बेशुद्ध करून आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला आहे. शिवाय या व्हीडीओच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. व्हिडीओ बनवण्यासाठी संशयित मावशीने एका मुलाची मदत घेतली आहे. परंतु, व्हिडीओ तयार करणाऱ्या या संशयिताने एक वर्ष पीडित मुलीचे शोषण केल्याची माहिती समोर आली आहे. 


पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर शोषण करणाऱ्या मुलाला आणि मावशीला साकोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोवर्धन बावनकुळे (25, रा. शिवनी मोगरा, ता. लाखनी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.


पीडीत मुलगी ही गोंदिया जिल्ह्यातील असून एका वर्षा आधी ती आणि तिची आई साकोली तालुक्यातील एका गावात चुलत मावस बहिणीकडे विवाह समारंभासाठी आले होते. समारंभ आटोपल्यानंतर दोघीही मुक्कासाठी थांबले. त्यावेळी चुलत मावशीने पीडितेला चहा दिला आणि तिला साड्या पाहण्यासाठी धाब्यावर बोलाविले. काही क्षणातच पीडित मुलीला चक्कर आली. काही वेळानंतर मुलगी उठली त्यावेळी ती निरवस्त्र अवस्थेत होती. त्यामुळे तिने आपल्या मावशीला याबाबत विचारले असता, मावशीने तिला आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ दाखविले. तसेच कोणाला सांगू नकोस, अशी दमदाटी केली. त्यानंतर वर्षभर हा सर्व प्रकार सुरू राहिला. 


ज्या मुलाने मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओ तयार केले तो हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीला वारंवार फोन करत असे. शिवाय तिच्या गावी जाऊन तिचे लैंगिकशोषण करत होता. मागील महिन्यात पीडित मुलीच्या गावी पुन्हा एक लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक तेथे आले होते. यावेळी मावशीने मुलीला बाहेर फिरायला नेले त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीला आला.


पीडितेच्या आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ साकोली पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली. पीडिता आणि तिच्या पालकांच्या तक्रारीवरून मुलगा व तिच्या मावशीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी साकोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.