Bengaluru BPO Company Nude Photos Incident : बेंगळुरूमधील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने (22) तिच्या सहकाऱ्याच्या प्रियकराच्या मोबाईलमध्ये तिचे आणि इतर महिलांचे सुमारे 13,000 नग्न फोटो असल्याचा मोठा आरोप केला आहे. महिलेने दावा केला की, जेव्हा तिने प्रियकराच्या मोबाईलमधील गॅलरी ओपन केली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्यासह इतर काही मैत्रिणींचे नग्नावस्थेतील फोटो सापडले. या प्रकाराची तिने कंपनीच्या लीगल टीमला या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.


'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, बेलंदूर येथील बीपीओच्या कायदेशीर विभागाच्या प्रमुखाने 23 नोव्हेंबर रोजी 25 वर्षीय आदित्य संतोषविरुद्ध सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल केली आणि याप्रकरणी कारवाईची मागणी केली. आरोपी संतोष आणि त्याची महिला सहकारी गेल्या चार महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यासोबत घालवलेले जिव्हाळ्याचे क्षणही संतोषने या फोनमध्ये रेकॉर्ड केले होते.


मुलीने प्रियकरासोबतचे नाते तोडले


मोबाईल फोनमध्ये आपल्या खासगी क्षणांचे  फोटो पाहिल्यानंतर गर्लफ्रेंडने फोटो डिलीट करण्याचे ठरवले होते. मात्र, गॅलरीतील इतर फोटो पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. 


यानंतर मुलीने प्रियकर संतोषसोबतचे संबंध तोडून 20 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची माहिती कार्यालयातील वरिष्ठांना दिली आणि भविष्यात कोणत्याही सहकाऱ्याला अडचणी येऊ नयेत म्हणून कारवाईची मागणी केली. काही छायाचित्रांमध्ये छेडछाड झाल्याचा संशय तक्रारदार मुलीला आहे. 


कंपनीत काम करणाऱ्या इतर महिलांच्या सुरक्षेचा विचार करून कंपनीच्या भारत विभागाच्या प्रमुखाने तात्काळ पोलीस तक्रार नोंदवण्याची सूचना दिली. 


फोटो लीक झाले असते तर...


कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले की,  फोटो लीक झाले असते तर इतर अनेक महिलांवर परिणाम झाला असता. परंतु यामुळे कार्यालयातील इतर महिलांना कोणतेही नुकसान झाले नाही. असे अश्लील फोटो काढण्यामागील त्याचा हेतू कोणालाच माहित नव्हता. फोटो लीक झाले असते तर महिलांना मोठा मानसिक धक्का बसला असता. 


आरोपी हा कंपनीत ग्राहक सेवा एजंट म्हणून पाच महिन्यांपासून काम करत होता. फोटोंशी छेडछाड करण्यासाठी त्यांनी कंपनीच्या कोणत्याही साधनांचा वापर केलेला नाही, असे कंपनीने स्पष्ट केले.


महिलांना ब्लॅकमेलिंग?


पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, संतोषविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. इतके छायाचित्रे का ठेवली, त्याचा हेतू काय होता, हे अश्लील फोटो कुठून मिळवली आदी बाबत माहिती घेण्यासाठी आम्हाला आणखी काही काळ हवा आहे. 


आरोपीच्या मोबाईलमधील काही फोटो हे  छेडछाड केलेले आहेत. तर काही खरे आहेत. त्याचा वापर त्याने कोणत्या महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी केला होता का, याचीही चौकशी केली जात आहे. त्याच्या फोनमधील चॅट हिस्ट्री आणि फोन कॉल्सचीही चौकशी केली जात आहे.