बेळगाव : व्यसनाधिनता माणसाला दुष्कर्म आणि दृष्कृत्याकडेच घेऊन जाते, त्यामुळे व्यसनापासून दूर राहा. व्यसन करु नका, आरोग्याला सांभाळा असा सल्ला डॉक्टरांसह गुरुवर्य आणि साधू-संत-महात्म्यांकडून दिला जातो. मात्र, अनेकदा माणसाला लागलेलं व्यसन सुटत नाही. काहीवेळा ही व्यसनाधिनता जीवावर बेते. बेळगावमध्ये (Belgaum) अशीच एक दुर्दैवी घटना घडली असून दोन भावांना असलेलं गांजाचं व्यसन एकाच्या जीवावर बेतल्याचं पाहालया मिळालं. गांजा ओढण्यावरून दोघा भावंडांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसन होऊन दोघेही भाऊ तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत (Accident) एक जण जागीच ठार झाला तर दुसरा दोन्ही पाय तुटून गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील निलजी गावामध्ये  घडली. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवरही शोककळा पसरली आहे. मात्र, दोन्ही भावांचे गांजाचे व्यसनच या दुर्घटनेत कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे.


स्वत:च्या घराच्या इमारतीवरील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने ही दुर्घटना घडली. त्यामध्ये जागीच मृत्युमुखी पडलेल्याचे नांव सुशांत सुभाष पाटील (वय 20, रा. निलजी) असे असून त्याचा मोठा भाऊ ओंकार सुभाष पाटील (वय 23, रा. निलजी) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी ओंकारला उपचारासाठी बेळगाव येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सुशांत व ओंकार या दोघांना गांजाचे व्यसन  होते. व्यसनाधीन झालेले हे दोघे घरातील कामांकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे पालकांकडून त्यांना सतत बोलणे खावे लागत असे. शुक्रवारी रात्री देखील घरातील कामे करत नसल्याबद्दल पालकांनी दोघांनाही चांगलाच दम दिला होता. त्यानंतर काम कोण करणार यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर, दोघेही गांजा ओढण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेले. गांजा ओढण्यावरून झालेल्या वादात दोघांचा तोल जाऊन ते इमारतीवरून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामध्ये सुशांत याचा जागीच मृत्यू झाला तर ओंकारच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. ओंकारवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


रायगडमध्ये 14 वर्षीय मुलाची हत्या


रायगडच्या पेण शहरातील फणस डोंगरी येथे एका 14 वर्षीय गणेश बाळू चुणारे या अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपीने हत्या करून या मुलाचा मृतदेह चुणारे गावातील आंबेडकर शाळा येथील झुडपात टाकून दिला होता. त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी  पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पेणचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत. 

हेही वाचा


बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया