बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये (Santosh Deshmukh Murder Case) आरोपींच्या संबंधित रोज एक नवीन माहिती समोर येत आहे. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरल्याचं दिसतंय. आताही त्यांनी एक नवा दावा केला आहे. संतोष देशमुखांचा मारेकरी असलेल्या विष्णू चाटेने बीड ऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केलीय या बद्दल त्यांनी नवीन माहिती उजेडात आणली आहे. लातूर कारागृहामध्ये आरोपी विष्णू चाटेच्या संबंधित नातेवाईक आणि जवळचे लोक असल्यानेच त्याने त्या कारागृहाची मागणी केल्याचा दावा दमानिया यांनी केला. 


सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये विष्णू चाटे याचाही समावेश आहे. त्याने बीड कारागृहाऐवजी लातूर कारागृहाची मागणी केल्याचं दमानियांनी सांगितलं. तसेच या छोट्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस कसा काय असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. विष्णू चाटेची ही मागणी पूर्ण करण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. पण त्याचसोबत विष्णू चाटेने लातूरची मागणी का केली याबद्दलही खुलासा त्यांनी केला.


लातूर कारागृहात विष्णू चाटेच्या मर्जीतले लोक


लातूर कारागृहामध्ये विष्णू चाटेच्या जवळची लॉबी कार्यरत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. त्याच्या जवळचा नातेवाईक नारायण मुंडे आहे. दमानिया यांनी त्याचा उल्लेख सुभेदार असा केलाय आहे. तर दुसरा मुरलीधर गित्ते हा बंदुकवाल्या फडचा मेव्हणा असल्याचं दमानिया म्हणतात. तर तिसरा व्यक्ती श्रीकृष्ण चौरे हा चाटेचा मावसभाऊ आणि पाच पोकलेनचा मालक असल्याची माहिती दमानिया यांनी दिली आहे. 


आरोप हा समाजाच्या विरोधात नाही


आपण जो आरोप करतोय तो कोणत्याही समाजाच्या विरोधात नसल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. असे कारागृह एखादा आरोपी का मागतोय हे समजून घ्या असं त्या म्हणतात. त्याचवेळी आपण केलेला नात्यांचा दावा हा कन्फर्म करता येत नाही असंही त्या म्हणतात. 


स्पेशल ट्रीटमेंटची सुरुवात 


विष्णू चाटेच्या कारागृहातील आगमनापासूनच त्याच्या स्पेशल ट्रीटमेंटची सुरुवात झाल्याचं अंजली दमानिया म्हणतात. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ही मुंबईला हलवण्याची गरज आहे. तसेच या आरोपींनाही मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये पाठवावं अशीही मागणी दमानिया यांनी केली आहे.


या संदर्भात राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात येणार असल्याचं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं आहे. 


 






ही बातमी वाचा :