बीड : कमी दिवसात पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेणारे काही कमी नाहीयेत. असाच प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. तीन वर्ष हप्ते भरल्यानंतर पाचव्या वर्षी दामदुप्पट रक्कम मिळेल आणि त्या रकमेचा प्लॉट किंवा फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून पुण्याच्या मेरिट लँडमार्क या कंपनीने बीडमधल्या ठेवीदारांना तब्बल नव्वद लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.


जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून फसवणारी ही काही पहिली कंपनी नाही. चेन सिस्टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या पतसंस्था तसेच छोट्या मोठ्या कंपन्यानी यापूर्वी सुद्धा अनेक लोकांना गंडा घातला आहे. मेरीट लँडमार्क या कंपनीने बीड शहरातील जालना रोड वरती एक स्वतःचं कार्यालय एक वर्षापूर्वी थाटलं होतं. अगदी एक हजार रुपयापासून गुंतवणूक करुन तीन वर्ष हप्ते भरा व पाचव्या वर्षी दाम दुप्पट रक्कम मिळवा अशी जाहिरात करण्यात आली होती.


विशेष म्हणजे लोकांनी जमा केलेल्या पैशातून फ्लॅट किंवा प्लॉट देण्याचे आमिष या कंपनीने दाखवल्याने अनेक लोकांनी या कंपनी मध्ये पैसे भरायला सुरुवात केली. 2014 ते 2017 या काळामध्ये या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जमा झाली.


पाच वर्षानंतर ज्या गुंतवणूकदारांची रक्कम दाम दुप्पट होण्याची वेळ आली त्यावेळी मात्र या कंपनीने बीड शहरातले आपले कार्यालय बंद केले. या कंपनीकडे बीड शहरातील गुंतवणूकदारांच्या 89 लाख 94 हजार 400 रुपयांच्या ठेवी जमा आहेत. आता मुदत संपून गेली तरीही या कंपनीने लोकांना त्यांच्या पैशाचा परतावा दिला नाही. बीड शहरातील बापूसाहेब गळगटे यांनी बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. यावरुन मेरिट लँडमर्कचे संचालक महेश मुंगसे, सुरेश जाधव, किरण अटपालवार, महादेव साळुंखे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
हा सगळा प्रकार पैशाशी संबंधित असल्याने आणि मेरीट लँड मार्क या कंपनीने केवळ बीडमध्ये लोकांची फसवणूक केली किंवा राज्यांमध्ये इतर ठिकाणी सुद्धा असाच प्रकार घडला आहे का याचा तपास करण्यासाठी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे.


आमिषांना बळी न पडण्याचे पोलिसांचे आवाहन
कमी कालावधीत रक्कम दाम दुप्पट करण्याचे आश्वासन असो की रोज पैसे भरुन फ्लॅट, प्लॉट मिळवा अशा फसव्या जाहिराती असो, अनेक वेळा अशा आमिषाला सर्वसामान्य लोक बळी पडतात आणि याचाच गैरफायदा अशा कंपन्या असतात. त्यामुळे अव्यवहार्य आणि फसव्या जाहिराती संदर्भात खातरजमा करुनच आपल्या पैशाची गुंतवणूक करावी असं आवाहन बीड पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या :