Beed Crime : बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंद्यांसह शस्त्र बाळगून दहशत पसरविणाऱ्या विरूध्द कडक कारवाईचे आदेश दिलेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईतील म्हाडा कॉलनी परिसरात पुण्यातील कोयता गँगमधील कुख्यात फरार आरोपी गोरख सातपूते आणि त्याचा साथीदार तात्याराव उर्फ वैभव विजय पहाडे या दोघांना मोठ्या शिताफीने गजाआड केले. यावेळी त्यांच्याकडून कोयता, तलवार, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेला रिक्षा जप्त करण्यात आला.
पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अवैध धंदे आणि शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती काढून कारवाईच्या सूचना टीमला दिल्या.
याबाबत अधिकची माहिती अशी की, गेवराई उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली एक इसम रिक्षामधुन अवैध शस्त्र घेऊन जात असल्याचे समजताच पोलीसांनी सापळा लावून म्हाडा कॉलनी जवळील रस्त्यावर रिक्षा अडवला. त्यावेळी पथकाला पाहुन आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलीसांनी त्यांच्यावर झडप घातली. यावेळी पोलीसांनी गोरख सातपुते आणि तात्याराव उर्फ विजय पहाडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून एक कोयता, तलवार, चाकू व गुन्ह्यात वापरलेला रिक्षा असा एकूण १ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात सहाय्यक फौजदार परशुराम जगताप यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरूध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूते आणि पहाडे हे दोघेही पुणे येथील कोयता गॅगचे सदस्य असुन काळेवाडी पोलीस ठाण्यात दाखल हाफ मर्डरच्या गुन्ह्यामध्ये ते फरार आरोपी आहेत. दोन्ही आरोपीताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेवराई पोलीसांच्या ताब्यात दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या