Beed Firing Case : बीडच्या परळी तालुक्यातील नाथरा या गावात उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाने फायरिंग केल्याची घटना घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रकाश मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनीष पाटील हे करत आहेत. दरम्यान नाथरा हे भाजप नेत्या पंकजा मुंडे व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे गाव असून या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्याने याची चर्चा होत आहे.
काही आठवड्यांपूर्वी झालेल्या गोळीबारात बापू आंधळे यांची हत्या
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात काही आठवड्यांपूर्वी झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला होता. या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनले होते. आता पुन्हा एकदा बीडमध्ये गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बापू आंधळे (Bapu Andhale) हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते (Baban Gite) यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या