बीड : जिल्ह्यात किती बॉस आहेत, किती आका आहेत, हा प्रश्न पडावा असे एक एक किस्से रोज समोर येत आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड संबंधांवरुन आमदार सुरेश धस यांनी टीका केली. पण त्यांच्याच 'खोक्या' सतीश भोसलेचे कारनामे समोर आले. ते ताजं असतानाच दुसरे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएच्या दमदाटीचा एक व्हिडीओ आणि स्वत: क्षीरसागर नायब तहसीलदाराला धमकी देतानाची एक ऑडिओ क्लिप समोर आली. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाच्या मारामारीचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला. बीडच्या प्रत्येक आमदाराच्या दिमतीला असे लोक कार्यरत आहेत का हा प्रश्न विचारला जातोय.

बीडमधील एखा कारच्या शोरुममध्ये मॅनेजरला मारहाण होतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. चार पाच लोकांनी शोरुमच्या मॅनेंजरला मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांपैकी दोघेजण पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यातल्या एकाच नाव आहे सतीश शेळके तर दुसरा आहे गणेश बरनाळे.

बीडमधील मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल

परळी परिसरातील मुंडे -कराड, आष्टी परिसरातील धस-खोक्याभाई यांच्या पाठोपाठ बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे पीए-कायकर्ते चर्चेत आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र झाल्या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले आहेत. तसंच ते कार्यकर्ते आपले नसल्याचं सांगत तात्काळ आपले हात सुद्धा झटकले आहेत. ही घटना 12 डिसेंबर 2024 रोजीची आहे.  

तो धागा पकडत धनंजय देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, कृष्णा आंधळे हा फरार आरोपी असताना त्याच्या जन्मदिनादिवशी त्याचे स्टेटस ठेवले जात आहेत. अशोक मोहितेंवर हल्ला केला जात आहे. या घटना वारंवार घडत आहेत. यांना कडक शासन होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. 

मारहाण झालेल्यांवरच गुन्हे दाखल

दरम्यान खोक्या गँगच्या मारहाणीत जखमी झालेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच खोक्याच्या नातेवाईकांनी शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यात ॲट्रॉसिटी पोस्को आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण असे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. असा खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीती पिता पुत्राने यापूर्वी व्यक्त केली होती हे विशेष.

दरम्यान बीडमधील आकाची चर्चा ज्यामुळे सुरु झाली, त्या संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडेंसह दहा पोलिसांना सहआरोपी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी पुन्हा केली. धनंजय मुंडेच्या फोननंतरच वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला असा दावाही त्यांनी केला.

बीड जिल्ह्यातील राजकीय गुंडगिरीची वेगवेगळी रुपं पाहायला मिळत आहेत. मस्साजोग हत्याकांड आणि परिसरातील गुंडगिरी यावरुन धनंजय मुंडेंवर हल्ला करण्यात आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर आघाडीवर होते. आता त्यांच्या जवळच्या लोकांच्या गुंडगिरीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. बीड जिल्ह्यात सगळीकडेच आका आणि आकाचे आका आहेत का असा प्रश्न विचारला जातोय.

 

ही बातमी वाचा: