मुंबई : राज्य सरकारची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा योजना (Anandacha Shidha Scheme) आता बंद करण्यात आली आहे. एबीपी माझाने या आधीच तशी बातमी दिली होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या माध्यमातून सणाच्या दिवशी राज्यातील 1 कोटी 63 लाख लोकांना याचा लाभ मिळत होता. राज्यातील तिजोरीमध्ये असलेल्या खडखडाटीमुळे ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. 

Continues below advertisement


आनंदाचा शिधाच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होतं. ही योजना आता बंद करण्यात आली आहे.


नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला काहीशी बगल दिल्याचं दिसून आलं. या संदर्भात एबीपी माझाने या आधीच बातमी दिली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.  या योजनेच्या माध्यमातून दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती अशा सणांच्या निमित्ताने फक्त 100 रुपयांमध्ये पाच वस्तू दिल्या जायच्या. 


योजना बंद करण्यामागचं कारण अस्पष्ट


गेल्या निवडणुकीत महायुतीकडून अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांना निधीचं वाटप करण्यात आलं आहे. त्यामध्ये आनंदाचा शिधा या योजनेला कुठेतरी बगल दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे आनंदाचा शिधा ही योजना आता बंद झाल्याचं स्पष्ट आहे. 


लाडकी बहीण योजनेचा फटका?


आनंदाचा शिधा योजना बंद होण्यामागे निश्चित असं कारण समोर आलं नाही. तरीही राज्यात लाडकी बहीण योजनेचा फटका या योजनेला बसला असल्याची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेला देण्यात आलेल्या निधीमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असून पुढेही अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आनंदाचा शिधा ही योजना राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली होती. त्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या . आता ही योजनाच बंद करण्यात आली आहे.


आनंदाचा शिधा बंद करण्यात आल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. या आधी शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा या योजनांचा निवडणुकीच्या काळात उपयोग करुन घेतला आणि आता त्या बंद केल्या जात आहेत. या माध्यमातून जनतेला गाजर दाखवण्याचं काम सुरू असल्याची टीका काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली.