Beed Jat Panchayat Controvercy: सासऱ्यानं समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्याची शिक्षा आता सुनेला भोगावी लागतेय.सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर फोडत पुढील सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा धक्कादायक निर्णय  जातपंचायतीनं घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र महिलेच्या तक्रारीवरून 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतीचा मुद्दा समोर आला आहे.


नक्की प्रकरण काय?


बीडमध्ये सध्या जातपंचायतीतले हे प्रकरण चर्चेचा विषय ठरला आहे. सासऱ्यानं समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला आणि त्याचीच शिक्षा सुनेला भोगावी लागत आहे. मालन फुलमाळी यांचे सासरे नरसु फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. यांची जात तीरमाली आहे. सासू-सासर्‍याच्या मृत्यूनंतर 2017 मध्ये मालन फुलमाळी यांना जातीत सामावून घेण्यात आल. मात्र आता जातपंचायतीचा दंड न भरल्याचे कारण देत त्यांना पुन्हा एकदा बहिष्कृत करण्यात आलं. सध्या हे कुटुंब कडा कारखान्यावर वास्तव्यास आहे. आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असता तरी यातील आरोपींना अटक करून न्याय देण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.


दंड दिला नाही म्हणून जातपंचायतीचा निर्वाळा


मालन शिवाजी फुलमाळी असं या पीडित महिलेचे नाव आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. सासऱ्याने प्रेमविवाह केल्यानंतर जात पंचायत बसविण्यात आली. यामध्ये नरसू फुलमाळी यांना २ लााख ५० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात राहणारे शिवाजी पालवे यांच्यामार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे होती.


जात पंचायतीच्या प्रकरणात लक्ष घाला: सुषमा अंधारे


बीडच्या आष्टीतील महिलेवरील जातपंचायतीच्या बहिष्कार प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, आपल्याकडे जात पंचायती विरोधात कायदा झालेला आहे. मी स्वतः जातपंचायतीने उभ्या केलेल्या चळवळीत काम करते. जातपंचायतीकडून अशा आघोरी अमानवी पद्धतीने विशेषतः संविधानिक व्यवस्था असताना सुद्धा कायदा हातात घेण्याच्या घटना घडत आहेत. या निश्चित चिंतनीय गंभीर आहेत. शासनाने याची दखल घ्यावी आणि आष्टी प्रकरणातील महिलेला न्याय देण्याची मागणी अंधारे यांनी केली.