Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी (Crime News) विश्वात खरंच पोलिसांचा आणि कायद्याचा धाक उरला आहे की नाही? हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने विचारण्याची वेळ आली आहे. त्यामागील कारण म्हणजे बीडच्या निपाणी टाकळी येथील ग्रामसभेदरम्यान उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी गावात बोगस कामं करून बिलं उचलू नका, असे आवाहन केले होते. या ग्रामसभेनंतर तू ग्रामसभेत बोगस कामासंदर्भात कसा काय बोलला? असा जाब विचारत सरपंच पती भगवान राठोड, जयकोबा राठोड आणि इतर 4 ते 5 जणांकडून माजलगाव-परभणी या रस्त्यावर उपसरपंच चव्हाण यांना काठी दगडाच्या सहाय्याने मारहाण करण्यात आलीय. या मारहाणीत चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. तर जखमी उपसरपंचावर बीड जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू असुन या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय.
भर दिवसा माजलगाव-परभणी रस्त्यावर उपसरपंचाला मारहाण
एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाण आणि हत्येनंतर बीडचे नाव संपूर्ण देशभरात गाजत असताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी सातत्याने चर्चेत आली आहे. अशातच माजलगाव-परभणी या रस्त्यावर उपसरपंच चव्हाण यांना किरकोळ वादातून भर दिवसा झालेली मारहाण अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. दरम्यान या प्रकरणी आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र या निमित्याने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याचे बघायला मिळाले आहे.
पिस्तूल सोबत फोटो काढून स्टेटसला ठेवले, केज पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बीडच्या केज तालुक्यातील देवगाव येथील गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे आणि एका अज्ञात व्यक्तीने एका हॉटेलमध्ये बसून पिस्तूल सोबत फोटो काढले आणि तेच फोटो व्हाट्सअप स्टेटसला लावले. यानंतर पिस्तूल सोबतचे हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात ARM ACT नुसार चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यात अनेक वेळा विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत. आता या प्रकरणाचा तपास केज पोलिस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या