Beed Crime: बीड जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या मारहाणीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी गावात माजी सरपंचाने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शेत रस्त्याच्या वादातून झालेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं घडलं काय?
प्रकाश काशीद असं जखमी तरुणाचं नाव आहे. साक्षाळ पिंपरी गावातील माजी सरपंच गोरख काशीद याने रस्त्याच्या वादातून प्रकाश काशीदच्या डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. प्रकाशला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गोरख काशीदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी माजी सरपंचाला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
या संदर्भात बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी माहिती देताना सांगितलं की, “साक्षाळ पिंपरी गावात झालेल्या हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. कोयत्याचा वापर करून केलेला हल्ला हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.
बिडमध्ये हिंसाचार थांबेना !
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध कारणांवरून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गावोगावी रस्त्याचे वाद, वैयक्तिक वाद, राजकीय कुरबुरी यामुळे अनेकांना मारहाणीला सामोरं जावं लागत आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी अधिक कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे .
कपडे काढत अमानुष मारहाण, कामगाराचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वाळूज एमआयडीसी परिसरातून अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबेलोहळ येथे गट नंबर 37 वर एक थरकाप उडवणारी घटना समोर आली. आज (12 जुलै) सकाळच्या सुमारास एका 23 वर्षीय कामगार अर्जुन रतन प्रधान याचा अमानुष मारहाण करून खून (Crime News) करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.