Beed Crime : बीड (Beed) जिल्ह्यातल्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा चंदन (Sandalwood) चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून चंदनासह तब्बल वीस लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच क्विंटल चंदनाचा गाभा, एक चारचाकी गाडी असा एकूण 20 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना अटक केली आहे.
बीड तालुक्यातील मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर असलेल्या महाजनवाडी येथे अशोक रामहारी घरत याने आपल्या घरामध्ये बेकायदेशीररित्या चंदनाच्या लाकडांचा साठा करुन ठेवल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. अशोक रामहरी घरतने काही जणांच्या मदतीने बेकायदेशीररित्या शेतातून चंदनाची झाडे (Sandalwood Tree) तोडून त्यातील गाभा चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी घरात आणून ठेवला होता.
त्यानंतर स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी शनिवारी रात्री उशिरा आपल्या पथकासह जाऊन अशोक घरत याच्या घरावर छापा टाकला. यावेळी एक व्यक्ती चंदनाचा गाभा मोजत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी तात्काळ त्याला अटक केली.
यावेळी घराची झडती घेतली असता घरात 5 क्विंटल 99 किलो चंदनाचा तासलेला गाभा यासह लाकडे, वजन काटा, वाकस, कुऱ्हाडी आणि बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस हवालदार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन दहा आरोपींविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाख केलेल्यांमध्ये ज्यांना चंदन पुरवायचे त्या तीन कंपन्यांच्या मालकांचाही समावेश आहे.
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस कर्मचारी बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, अमजद सय्यद, राजू वंजारे, रामहरी भांडाने, संजय टूले, शिवाजी कागदे, दीपक जावळे आणि आशा चोरे यांनी केली.